'भास्कर जाधव स्टँड-अप कॉमेडी का सुरू करत नाही?'; अतुल भातखळकर यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 02:59 PM2021-12-22T14:59:23+5:302021-12-22T15:15:24+5:30
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई: आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख मंत्री नितीन राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नक्कल या सभागृहात केली जात असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे आहेत. विधानसभेच्या सभागृहात अशाप्रकारे अंगविक्षिप्त करत असतील तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे. कुठल्याही नेत्याची बदनामी या सभागृहात होता कामा नये. अध्यक्षांनी भास्कर जाधव यांना समज द्यावी आम्ही माफी मागायला सांगावी असं त्यांनी म्हटलं. यावेळी सभागृहात भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ केला.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे. भास्कर जाधव स्टँड-अप कॉमेडी का सुरू करत नाहीत?, असा सवाल उपस्थित करत विधानसभेत नौटंकी करण्यापेक्षा हा पर्याय बरा आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
भास्कर जाधव स्टँड-अप कॉमेडी का सुरू करत नाहीत? विधानसभेत नौटंकी करण्यापेक्षा हा पर्याय बरा आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 22, 2021
दरम्यान, पंतप्रधान असो किंवा अन्य कुठल्याही नेत्याची नक्कल करणे योग्य नाही. भास्कर जाधव यांनी अशाप्रकारे कृत्य केले असेल तर ते आधी तपासून पाहावं. भास्कर जाधव यांच्या कृत्याचे समर्थन करणार नाही. परंतु अध्यक्षांनी रेकॉर्ड झालेला प्रकार तपासून पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील म्हणाले त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अंगविक्षेप करुन भाष्य करणं हे योग्य नाही असं म्हणत भाजपाने सभागृह स्थगित करुन तात्काळ या प्रकरणाची तपास करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.