Join us  

'शरद पवारांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला'; अतुल भातखळकर यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 4:49 PM

जेम्स लेननच्या या दाव्यानंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी लेखक जेम्स लेनच्या छत्रपती शिवरायांच्या वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिल्याचा आरोप केला होता. मात्र हा आरोप जेम्स लेननं फेटाळला आहे. 

'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या जेम्स लेन लिखित पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्त्रोत नव्हते अशी माहिती स्वतः जेम्स लेनने दिली आहे. इंडिया टुडेनं ई-मेलद्वारे त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत या पुस्तकाबाबत त्यांनी भाष्य केलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नसून 'त्या' पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही, असा दावाच जेम्स लेननं केलाय. तसंच पुस्तक लिहीत असताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही जेम्स लेननं या मुलाखतीत सांगितलं आहे.

जेम्स लेननच्या या दाव्यानंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला. ज्या मुद्यावरून पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद पेटवला तो मुद्दाच निकाली निघाला, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?-

बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास दाखवला, त्याचा मी यापूर्वीही विरोध केला आणि आजही करतो, मी मागे एकदा पुरंदरेबद्दल बोललो होतो. पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात जिजामातेने महाराजांना घडवलं, हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी घडवल्याचं म्हटलं होतं. त्याला माझा सक्त विरोध आहे. महाराजांना जिजा मातेनेच घडवंल आहे. महाराजांच्या आयुष्यात सर्वात मोठं योगदान जिजामातेचे आहे. 

पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली, त्याला माझा विरोध आधीही होता आणि आताही आहे असं शरद पवार म्हणाले होते. तर दुसरी गोष्ट म्हणजे, जेम्स लेनेने त्याच्या पुस्तकात जे लिखाण केलं होतं, ते त्याने पुरंदरेंच्या माहितीच्या आधारे लिहील्याचं म्हटलं होतं. अतिशय घाणेरडं लिखाणं एखाद्या लेखकाने केले आणि त्याला माहिती पुरवण्याचे काम पुरंदरनी केले. त्यावर पुरंदरने कधीही स्पष्टीकरण दिले नाही. त्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, असंही पवार म्हणाले होते.

टॅग्स :शरद पवारअतुल भातखळकरराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा