लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार; अतुल भातखळकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 02:32 PM2021-08-06T14:32:28+5:302021-08-06T14:32:46+5:30
हॉटेल, बार, दारूची दुकाने सुरू करणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यास वाटाण्याच्या अक्षता लावत आहे.
मुंबई- मुंबईतील चाकरमान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन मध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या सर्वांना प्रवास करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी व ठाकरे सरकारच्या वेळकाढू भूमिकेविरोधात आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई भाजपाच्या वतीने कांदिवली पूर्व स्टेशनवर रेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला व भातखळकर यांच्यासह 50 ते 60 भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली असा आरोप त्यांनी केला.
हॉटेल, बार, दारूची दुकाने सुरू करणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यास वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना केलेली असताना व रेल्वे मंत्रालयाने सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची तयारी दाखवलेली असताना सुद्धा घरबश्या ठाकरे सरकारकडून मात्र नकार दिला जात आहे.
पत्रकार, वकील यांना सुद्धा लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा 24 तासाच्या आत राज्य सरकारने लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अन्यथा लहरी, तानाशाही व तुघलकी ठाकरे सरकारच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.