मुंबई- बाबरी मशीद पाडण्यासाठी आपण अयोध्येत उपस्थित असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्ही बाबरीवर चढण्याचा प्रयत्न केला असता, तर तुमच्या वजनाने ती खाली पडली असती, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच शिवसैनिकांनी बाबरी पाडली, त्यामुळे त्यांना अभिमान वाटतो, असे बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही देवेंद्रजींच्या वजनावर बोललात....तेव्हा तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसून गुडग्याला हेडफोन लावल्याचं आठवलं..., असं म्हणत भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. बाकीच्यांच्या हिंदुत्व घंटाधारी आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांचा हिंदुत्व 'गधा'धारी आहे. म्हटलं बरोबर आहे. आमचं हिंदुत्व 'गधा'धारी होत, म्हणून आम्ही अडीज वर्षांपूर्वी तुम्हाला सोडलं. आमचे जुने फोटो तुमच्यासोबत येतात, त्यावरून तुमचा गैसमज झाला असेल. मात्र आम्ही गध्याला सोडलं आहे.'' भाजपला टोला लगावत ते म्हणाले, ''गाढवानं लाथ मारायची आधी, आम्ही लाथ मारली आता बसा बोंबलत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून राज्यात सभांचा धडाका सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात घेतलेल्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर सातत्याने सत्ताधारी शिवसेनेवर टीका होऊ लागली. मनसे-भाजपा यांनी घेतलेल्या सभांना उत्तर म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात सभा घेतली. या सभेसाठी शिवसेनेने मोठ्या प्रमाणात जाहिरात केली होती. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या सभेवर लागलं होतं.
शिवसेनेचा अयोध्या दौरा १५ जूनला
राज्यसभेच्या निवडणुका लागल्याने शिवसेनेचा अयोध्या दौरा पाच दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हा अयोध्या दौरा आता १० जूनऐवजी १५ जूनला होणार आहे, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली.
तुमच्यात बाळासाहेब दिसले - मंत्री आदित्य ठाकरे
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित जनसमुदायासमोर नतमस्तक झाले. सभेची पहिली रांग वांद्र्यात तर शेवटची रांग कुर्ल्यात आहे. गर्दी पाहून मलाही चालत यावेसे वाटले. या गर्दीत मला पंचमुखी हनुमान दिसले, रामसीता दिसले, भगवान शंकर दिसले, विघ्नहर्ता गणपती दिसले. हे शिवसैनिक आमची कवचकुंडले आहेत. आज तुमच्यात मला माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसले, माझी आजी दिसली. त्यामुळे नतमस्तक झालो, असे भावनिक उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले.