Maharashtra Budget 2023: “घोषणांचा पाऊस नाही, १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा शिंदे-फडणवीस सरकारचा संकल्प”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:11 PM2023-03-09T17:11:46+5:302023-03-09T17:12:33+5:30
Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राच्या नजीकच्या इतिहासातील हा सर्वांत चांगला, द बेस्ट अशा प्रकारचा अर्थसंकल्प असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
Maharashtra Budget 2023: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पा सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. या अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली असून, सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका करताना हा केवळ घोषणांचा पाऊस आहे, असे म्हटले आहे. यावर बोलताना भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, घोषणा केल्या हे विरोधकांनी मान्य केले ना, असा प्रतिप्रश्न करत, विरोधकांचे चेहरे आम्हाला पाहावत नव्हते. आम्ही शेतकऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे दरवर्षी ६ हजार रुपये देणार आहोत. पर्यावरणाला मदत करणाऱ्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. ५३ हजार रुपयांच्या भांडवली खर्चामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे, धार्मिक स्थळांचा विकास आहे. त्यामुळे रिलिजिअस टुरिझम वाढेल. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प आहे, असे अतुल भातखळकर यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत चांगला अर्थसंकल्प
पुढे बोलताना अतुल भातखळकर म्हणाले की, मला विचाराल तर महाराष्ट्राच्या नजीकच्या इतिहासातील हा सर्वांत चांगला, द बेस्ट अशा प्रकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला आहे. महाराष्ट्रात १ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आजच्या अर्थसंकल्पातून पडलेले आहे, असे भातखळकर यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांचा प्रीमियम २ टक्क्यांनी कमी केला. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सहन होत नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या तरतुदीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची मळमळ बाहेर पडतेय, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी विरोधकांवर पलटवार केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"