लाेकमत न्यूज नेटवर्ककल्याण : राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून कल्याणमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी स्वपक्षाच्या दिल्लीतील व महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेल्या राजकीय प्रयोगावर तोंडसुख घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे आणि कल्याण पूर्वेतील शिवसेना शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. जाहीर कार्यक्रम, सरकारी बैठका, सोशल मीडिया, अशा सर्व व्यासपीठांवरून आ. गायकवाड नाराजी प्रकट करतानाच काही महिन्यांपूर्वी आ. गायकवाड यांच्या नातवाच्या बारशानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याने आ. गायकवाड व त्यांच्या समर्थकांना चेव चढला. त्यांच्या शिवसेनाविरुद्ध टीकेला धार आली. त्याची परिणीती अखेर उल्हासनगरातील हिललाइन पोलिस ठाण्यातील गोळीबारात झाली.
आ. गायकवाड यांचा शिवसेनेला प्रथमपासूनच विरोध होता. २००९ साली शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे पुंडलिक म्हात्रे यांना आ. गायकवाड यांनी पराभूत केले होते. त्यावेळी मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना आणि गायकवाड यांच्यात राडा झाला होता. २०१९ साली भाजपकडून निवडणूक लढवताना शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या बाजूने शिवसैनिक होते. त्यात महेश गायकवाड हे आघाडीवर होते. प्रचारात आ. गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या जुन्या वादाला अधूनमधून तोंड फुटत होते. सोशल मीडियावर आमदारांच्या समर्थकांकडून काही पोस्ट टाकल्यानंतर त्यांचे खंडन करणाऱ्या पोस्ट शिवसेना शिंदे गटाकडून केल्या जात होत्या. आ. गायकवाड यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टमुळे वाद
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियावरील पाेस्टवरून वाद उफाळला. तो इतका विकोपाला गेला की, आ. गायकवाड यांनी खुली चर्चा करण्याचे आव्हान महेश गायकवाड यांना दिले. महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या दिशेने महेश गायकवाड निघाले असता कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरिता कोळसेवाडी पोलिसांनी महेश यांना अटक केली. आ. गायकवाड यांच्या कामाचे आणि शुभेच्छांचे बॅनर रातोरात हटविले जात होते. ते हटविण्यामागे महेश हेच असल्याचा आ. गायकवाड यांचा आराेप होता.
भाजपला वाद मिटवण्यात अपयश
लोकग्राम पुलाच्या भूमिपूजनास वाद विसरून सहभागी होण्यास शिवसेनेकडून आ. गायकवाड यांना सांगितले होते. तेव्हा ते त्या सहभागी झालेही होते. मात्र, वाद मिटला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आ. गायकवाड यांनी वादग्रस्त ट्वीट केले. त्यावेळी भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांना फोन करून पाेस्ट डिलीट करण्यास सांगितले होते. गृहखाते भाजपकडे असूनही स्थानिक पाेलिसांकडून भाजपला सहकार्य केले जात नसल्याची त्यांची तक्रार होती. २७ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. गायकवाड यांच्या घरी भेट देऊन भाजप त्यांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले, तर कल्याण महोत्सवात महेश गायकवाड यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी हजर राहून आपण महेश यांच्या पाठीशी असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.