मुंबई: विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे.
विधीमंडळ सचिवालयांच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाला पाठवली आहे. यामध्ये यादीमध्ये भाजपाच्या तीन, राष्ट्रवादीच्या एका आणि काँग्रेसच्या दोन आमदारांचा समावेश करण्यात आला होता. यातून भाजपाच्याकालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून ते सातवेळा निवडून आले आहेत. २०१४च्या निवडणुकीत देशात आणि राज्यात मोदी लाट असतानाही कालिदास कोळंबकर यांनी भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कालिदास कोळंबकर यांनी भाजपात प्रवेश करत पुन्हा विजय मिळविला.
दरम्यान, विधीमंडळ सचिवालयाने पाठवलेल्या यादीतील सहा आमदारांमध्ये कालिदास कोळंबकर यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता.