मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. परंतु सगळ्यांचीच स्वप्ने पूर्ण होतात असे नाही. शहरात सर्वसामान्यांना घर घेता यावे यासाठी शासनाच्या म्हाडा प्राधिकरणाकडून लॉटरी काढली जाते. काळानुरुप आता म्हाडा घराच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यात काही महिन्यापूर्वी म्हाडाने काढलेल्या लॉटरीत उच्चभ्रू वस्तीतील घरांनी कोट्यवधीचे आकडे पार केले होते. त्यात भाजपा आमदाराला लागलेली २ घरे आता त्यांनी सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपाचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार नारायण कुचे यांना आमदार कोट्यातून आणि एससी प्रवर्गातून २ घरे लागली होती. परंतु दोन्ही घरे परत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आमदार नारायण कुचे म्हणाले की, मला २ घरे लागली होती, ही दोन्ही घरे मुंबईच्या ताडदेव परिसरातील होते. लोकेशन चांगले होते. परंतु काही अडचणीमुळे, आर्थिक हफ्ता, मला बँक ५ कोटी कर्ज द्यायलाही तयार होते. परंतु एकंदर याचे व्याज आणि भविष्यातील परतफेड कशी करायची याची चिंता होती असं त्यांनी म्हटलं.
तसेच मुंबईत माझे कुठेही घर नाही, माझे घर असावे हे स्वप्न होते. माझ्या पीएला आणि मित्राला सांगून मी म्हाडाचा अर्ज भरला होता. मात्र त्यानंतर मी गणित जुळवले, भविष्यातील कर्जाची परतफेड योग्य झाली नाही तर आपली पत खराब होऊ शकते. आर्थिक अडचणींमुळे मी घर नाकारले. माझ्या प्रवर्गात वेटिंगला मंत्री भागवत कराड होते. त्यामुळे मी घर नाकारले तर आता त्यांनाच संधी मिळेल. मी भागवत कराडांसाठी घर सोडले नाही. माझे उत्पन्न बघा, माझे उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात परतफेडीची चिंता असल्याने मी सोडले आहे असा खुलासा भाजपा आमदार नारायण कुचे यांनी केला.
मे महिन्यात म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यात १ लाख ४५ हजार ८४९ जणांनी अर्ज भरले त्यापैकी १ लाख २० हजार १४४ अर्ज पात्र ठरले. म्हाडाच्या अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. नारायण कुचे यांना ताडदेव येथे लागलेल्या घराची किंमत साडे सात कोटीच्या आसपास होती.