"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:20 PM2024-05-23T15:20:02+5:302024-05-23T15:22:45+5:30
Nitesh Rane : पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघातानंतर कारवाईला झालेल्या दिरंगाईनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Nitesh Rane ( Marathi News ) : पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघातानंतर कारवाईला झालेल्या दिरंगाईनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कारवाईवरुन विरोधकांनी सरकारला घेरले होते, यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: पुण्यात येऊन पोलिसांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कारवाईचे आदेश दिले. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही आरोप केले आहेत. दरम्यान, आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधत सवाल उपस्थित केले आहेत.
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
भाजपा आमदार नितेश राणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे." नेहमी बोलणाऱ्या, प्रत्येक प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत? शरद पवार गटाकडून या प्रकरणावर प्रतिक्रीया का व्यक्त होत नाहीत? सुप्रिया सुळे आणि अग्रवाल कुटुंबाचे संबंध आहेत का?, असा सवालही नितेश राणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
"अग्रवाल कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? अग्रवाल कुटुंबाने जे वकील दिले आहेत ते वकील शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे माहिती आम्हाला मिळाली आहे, फडणवीस यांनी पुण्यात आयुक्तालयात बसून स्पष्ट भूमिका मांडली आहे, अपघाता प्रकरणी कडक कारवाई सुरू आहे. आता सुप्रियाताई या प्रकणावर गप्प का आहेत ते आम्हाला सांगावे, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.
पुणे अपघात प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले ६ प्रश्न
प्रकाश आंबेडकरांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत सहा प्रश्न विचारले आहेत. "येरवडा पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टाचं नातं काय आहे यासंदर्भातील प्रश्न विचारण्यातच अधिक वेळ घालवला. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या या दोघांना मद्यधुंदावस्थेत कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने उडवलं. दुसरीकडे या आरोपी मुलाला कथित स्वरुपात पिझ्झा आणि बर्गर देण्यात आलं," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
१) अल्पवयीन मुलाला क्लबमध्ये मद्य कसं काय देण्यात आलं?
२) शोरुमने नोंदणीकृत क्रमांकाशिवाय ही कार कशी दिली?
३) ही कार वाहतूक पोलिसांच्या नजरेतून कशी सुटली?
४) या मुलाला जामीन कसा मंजूर झाला? त्याला अल्पवयीन म्हणून कोठडी का सुनावण्यात आली नाही?
५) आठ तासांनंतर अल्कोहोल चाचणी का करण्यात आली?
६) उपमुख्यमंत्री या प्रकरणात मरण पावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आले पुण्यात आले की बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी आले होते?
असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पोस्टमधून विचारले आहेत.