रोहित पवार उद्या रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतिन यांनाही सल्ला देतील; नितेश राणेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:47 PM2022-03-09T14:47:11+5:302022-03-09T14:50:45+5:30
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपाने मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढला.
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करत ईडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. मंत्री नवाब मलिक यांना १२ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर सोमवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अजूनही महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही. परंतु सातत्याने भाजपाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपाने मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढला. सदर मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपाच्या या मोर्च्यात भाजपाचे विविध नेते देखील सहभागी झाले आहेत. भाजपाचे आमदार या ठिकाणी भाषण करत असून महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहे. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
महाविकास आघाडीचे मंत्री, घरातून न निघालेले मुख्यमंत्री, मविआवर नागासारखे बसलेले शरद पवारांना हा संदेश मिळालाच पाहिजे, मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहाल तर भाजपाचा कार्यकर्ता तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं. तसेच दाऊदसोबत व्यवहार केल्यामुळे आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितलं. नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. रोहित पवार उद्या रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिनला सुध्दा सल्ला देतील, असा टोला नितेश राणेंनी लगावला.
दरम्यान, आज पुन्हा पत्रकारांनी शरद पवार यांना नवाब मलिकांचा राजीनामा तुम्ही घेणार का?, असा सवाल विचारला. यावर नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून मुस्लिम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायचं हे घृणास्पद असल्याचे शरद पवारांनी म्हटले. तसेच शरद पवार यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नसल्याचे देखील यावेळी सांगितले.
अटक रद्द करा; अधिकारांचे उल्लंघन- मलिक
ईडीने मलिक यांना बेकायदेशीरपणे अटक करून त्यांचा जीवन जगण्याचा व स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे. मलिक यांचा दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविकता मलिक आणि दाऊद यांचा काहीच संबंध नाही. तसेच ईडीने पीएमएलए कायदा पूर्वलक्षित प्रभावाने लागू करून मलिक यांना या कायद्याखाली अटक केली आहे. मात्र, हा कायदा पूर्वलक्षित प्रभावाने लागू होऊ शकतो की नाही, याबाबत स्पष्टता नाही, असा युक्तिवाद मलिक यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे.