"सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे; आदित्य ठाकरेंसोबतही होते ऑनकॉल"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:47 PM2021-03-31T19:47:05+5:302021-04-01T19:36:53+5:30
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी (Mukesh Ambani Bomb Scare) भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता, या संपूर्ण प्रकरणानं राज्याच्या वातावरण ढवळून निघालं आहे, मुख्यत: या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIAने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं. सचिन वाझे (Sachin Vaze) याची चौकशी करताना NIAने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
सचिन वाझे यांनी NIA चौकशी करत असताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंह यांना ते विचारायचे नाहीत. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत होते, असा धक्कादायक आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, सचिन वाझे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राहत होते. ते वर्षावर का राहायचे? वर्षा कुणाचं निवासस्थान आहे? वर्षावर राहायची परवानगी सचिन वाझेंना कुणी दिली होती?, असे सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केले आहे.
तत्पूर्वी, ठाण्यातील मनसुख हिरेन यांची स्कोर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारी रोजी आढळली होती.(Mukesh Ambani Bomb Scare), या गाडीत स्फोटकांनी भरलेल्या जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर ५ मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला. यात महाराष्ट्र एटीएसनं निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना अलीकडेच अटक केली होती.
एनआयएच्या माहितीप्रमाणे, तपास पथकाला १४ मोबाईल क्रमांक सापडले त्यातील ५ मोबाईल नंबर सचिन वाझेंना देण्यात आले होते. यातील एका मोबाईल नंबरवरून सचिन वाझे मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी वापरत होता. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा उलगडा होण्यापर्यंत NIA चा तपास पोहचला आहे.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र एटीएस(Maharashtra ATS) करत होती, परंतु त्यानंतर हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला. NIA मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्हीचा तपास करत आहे, NIA ने कोर्टात हे दोन्ही प्रकरण एकमेकांनी जोडले आहेत असं सांगितलं आहे. सचिन वाझेला ३ एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.