मुंबई: राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. सर्वसामान्यांची तपासणी केल्याशिवाय मंत्रालयात कोणालाही परवानगी नाही. सर्व नेत्यांसाठीदेखील इथं चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. पण असं असताना देखील मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये चक्क बाटल्यांचा खच सापडलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंत्रालय हादरून गेलं आहे.
मुंबईतल्या मंत्रालयातून राज्याचा गाडा हाकला जातो. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी तपासणी केली जाते. पासशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मंत्रालयात चक्क दारुच्या बाटल्यांचा खच कसा आला? असा सवाल उपस्थित होत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, आता कळले..ठाकरे सरकार मधील काही मंत्री गुलाबराव आणि नवाब भाईसारखे येड्या सारखं का बडबड करत असतात..झिंगझिंग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?, असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील या घटनेचा निशेष केला आहे. मंत्रालयासारख्या ठिकाणी जिथे लोक आपल्या समस्या, अडचणी घेऊन येतात, ज्या मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी कसून तपासणी केली जाते , त्या मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच आढळून येणे ही अत्यंत चीड आणणारी आणि निंदनीय बाब आहे. कोरोनाची, पुरपरिस्थिती असताना मंत्रालयात दारुच्या बाटल्या कोणी आणल्या आणि कशा आणल्या याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
दरम्यान, सदर प्रकरणावर आता पुढे काय माहिती समोर येणार?, ठाकरे सरकार यावर उत्तर देणार का? मंत्रालयात दारूच्या बाटल्या पोहोचल्या कशा? याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या चौकशीत काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.