"त्यांना चपलेनं मारायचं"; आदित्य ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंचा टोला
By मुकेश चव्हाण | Published: January 4, 2021 08:59 AM2021-01-04T08:59:43+5:302021-01-04T10:41:14+5:30
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत टोला लगावला आहे.
मुंबई / औरंगाबाद : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरूच आहे. औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झालं नसल्यानं भाजपा, मनसे यांच्याकडून टीका करण्यात येत आहे.
औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी हलचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यामुळे विरोधी पक्षांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची सुरुवात केली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत टोला लगावला आहे.
नितेश राणे यांनी ट्विटवर आदित्य ठाकरेंचा औरंगाबादमधील भाषणाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतराबाबत भाष्य केलं आहे. ''काँग्रेस- राष्ट्रवादीच्या लोकांनी संभाजीनगर न बोलता औरंगाबाद म्हटलं की त्यांना चपलेनं मारायचं. त्यांना शेण खायायची सवय आहे, असं आदित्य ठाकरे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
R the “chappels”ready for the congress ncp people now ?
— nitesh rane (@NiteshNRane) January 3, 2021
Or we shud be using them on his party for standing with them now ??
P.s - don’t mind the voice even if he is a thackray! pic.twitter.com/mpN18PKJfr
दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी "महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत, असं सांगितलं आहे. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण, या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील, असेही संजय राऊत यांनी सांगितलं.
बाळा नांदगावकरांचा सवाल
उद्धव ठाकरेंनीच मला औरंगाबाद म्हणण्याची मुभा दिली, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील एक बातमीचे कात्रण आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शेअर केले आहे. या बातमीसह औरंगाबादच्या नामांतरणावरुन नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. ''संभाजीनगर हेच नामकरण झाले पाहिजे, श्रेय केंद्र अथवा राज्य सरकार कोणीही घ्यावे. सेनेला केवळ एवढे विचारावे वाटते की तुमचे मंत्री अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे? सोबत जोडलेला फोटो बरेच काही सांगून जात आहे. माननीय बाळासाहेबांचा शब्द व स्वप्न पूर्ण करावे.'', असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेसची भूमिका स्पष्ट
महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितंलय.
शिवसेना मंत्र्यांकडून संभाजीनगर असा उल्लेख
शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.