Join us

आदित्य सेनेच्या उलट्या बोंबा, मराठी माणसाला न्याय द्या; नितेश राणेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 9:30 AM

या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. 

मुंबई - मनपाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि परत सत्ताधारी आदित्य सेनेनं मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलटा बोंबा मारणं सुरू केलं आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकामुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे असा आरोप भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे. 

नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलंय की, पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एसआरएमधील झोपडपट्टी धारक खासगी विकासकांची नेमणूक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दिड वर्षांचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात. परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत एका बाजूला कोविडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी केली आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा सहा तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. आहे ते घर विकासकाने अडवून ठेवलंय आणि भाडे मिळण्याअभावी घरातून हकालपट्टी होतेय. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळतेय ना हक्काचे भाडेही मिळतेय. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वत: दरात विकण्यास बाध्य होतात असंही नितेश राणेंनी सांगितले. 

त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने ठोस पाऊल उचलून जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरू लागली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह येऊन गेले. निवडणुक आल्यावरच तुम्ही येता, तुमच्यासाठी मुंबई फक्त जमिनीचा तुकडा असेल. पण, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे. मुंबादेवी म्हणजेच मुंबई आमची आई आहे. आजकाल आईला गिळणारी लोकही येत आहे. मुंबई आणि कमळाबाईचा संबंध काय? मी पहिल्यांदा कमळाबाईवर बोलतोय. हा शब्द माझा नाही, बाळासाहेबांनी दिलाय. मुंबईवर चालून येण्याचे धाडस करू नका. दसऱ्याला यांची लख्तरे काढणारच आहे,' असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 

टॅग्स :नीतेश राणे देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेशिवसेना