मुंबई, महाराष्ट्रात राहायचं असेल तर...; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 04:26 PM2023-01-19T16:26:29+5:302023-01-19T16:26:58+5:30
ही हिंमत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आहे का? असा सवाल नितेश राणेंनी विचारला.
मुंबई - मुंबई, महाराष्ट्रात राहायचं असेल तर जो काही मानसन्मान हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारचा आदर ठेवावा. सरकारकडून सुरक्षा, फायदे अन् पैसे घ्यायचे आणि सरकारवर टीकाही करायची असे चालणार नाही. बॅगा भरून तुमच्या आवडत्या शहरात निघून जावं असा इशारा भाजपा आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला दिला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, मी आमदार असलो, कोकणातून निवडून आलो असलो तरी मुंबईत राहतो. मुंबईसाठी भाजपाने जे केले आज ३८ हजार कोटींचे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना भेट देतायेत. देवेंद्र फडणवीसांच्या दुरदृष्टीने मेट्रो मुंबईला मिळाली. देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे केवळ लिहिण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी ठेवले होते. पण आज मुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचं शहर बनवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात होतंय असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत घटनाबाह्य सरकार म्हणायचं आणि सरकारने दिलेल्या सुविधा वापरायच्या. सुरक्षा वापरायची, सामनाच्या पहिल्या पानावर सरकारची जाहिरात करायची आणि पैसे मिळवायचे. तुम्हाला थोडी तरी लाज राहिली असेल आणि स्वाभिमान उरला असेल तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने सरकारकडून काही घेणार नाही. पैसे घेणार नाही असं जाहीर करावं. ही हिंमत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आहे का? असा सवाल नितेश राणेंनी विचारला.
उद्धव ठाकरेंना काही काम उरणार नाही
आता उद्धव ठाकरेंच्या हाती काय राहिले नाही. उद्या धनुष्यबाण चिन्हासंदर्भात निकाल लागेल. आम्हाला आशा आहे हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला काही काम उरणार नाही. त्यामुळे त्यांनी बॅग उचलून निघून जावं. उद्धव ठाकरेंचं आवडतं शहर लंडनमध्ये वास्तव्यात जावे. बॅगा उचलण्यासाठी अनिल परब, अनिल देसाई आहेत असा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर केला आहे.