'ही' तर उद्धव ठाकरेंची जुनीच सवय; भाजपा आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 07:33 PM2020-01-06T19:33:29+5:302020-01-06T20:02:14+5:30
टप्प्याटप्प्याने हे एक-एक लोक राजीनामे देतील आणि येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे भाजप मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होईल.
मुंबई - मातोश्रीवर भेटायला आलेल्या एका शेतकरी आणि त्याच्या मुलीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले नाहीत. ही त्यांची जुनीच सवय आहे. यापूर्वी मातोश्रीतील मासा मेला म्हणून १४ दिवस उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब कोणाला भेटले नव्हते. शेतकरी तर लांबची गोष्ट आहे. यावरून त्यांचा खरा चेहरा ओळखा, अशी घणाघाती टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
सांताक्रूझ पूर्वेकडील मराठा कॉलनीत भाजपा कोकण जागृती संघटनेतर्फे रविवारी निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेने वर्षानुवर्षे मुंबई पालिकेची लूट केली. जनता आहे तिथेच राहिली; यांच्या एकाच्या दोन ‘मातोश्री’ झाल्या. आता राज्यात सत्ता आहे तर मग, मातोश्री ३, ४ आणि ५ पण होतील. लोकांची पिळवणूक करणाऱ्या या विश्वासघातकी लोकांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. आता मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल. यासाठी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असं आवाहन त्यांनी केलं.
तसेच आम्ही या सभेला येणार म्हणून पोलीस परवानगी देत नव्हते, कारण त्यांना माहीत आहे की, आम्ही इकडे येऊन कोणाची चिरफाड करणार! पण सत्तेत बसलेल्यानी लक्षात ठेवावे राज्याचे गृहखाते तुमच्याकडे असले तरी देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला दिला. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मुंबईत भाजपा पक्ष वाढला पाहिजे म्हणून आम्ही या सभेचे आयोजन केले आहे. इथल्या जनतेच्या हिताच्या आड कोण येत असले तर त्याला अंगावर घ्यायला इथला भाजप कार्यकर्ता तयार आहे. हे लक्षात ठेवा असंही त्यांनी बजावलं.
दरम्यान, शिवसेनेचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवून खासदार-आमदार झाले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक बिस्कीट टाकताच बाजूला गेले, कोकणी माणसासाठी शिवसेना असे घोषवाक्य देऊन यांनी फक्त स्वार्थ साधला. याचा आता हिशोब जनतेने घेतला पाहिजे. इथून हाकेच्या अंतरावर हे ठाकरे राहतात पण इथली परिस्थिती बदलायचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. वांद्रे पूर्व या एकाच विभागात ३-३ मंत्रीपदे घेतली. पण इथल्या जनतेसाठी काय केलं? असा सवाल आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला.
लवकर राज्यात भाजपची सत्ता
महाविकास आघाडीच्या रोज एका नेत्याच्या राजीनाम्याची बातमी येत आहे. टप्प्याटप्प्याने हे एक-एक लोक राजीनामे देतील आणि येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे भाजप मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होईल, असा मी तुम्हाला विश्वास देतो. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर २०२२ची मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपलाच विजय मिळवून द्यायचा आहे. कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे. तसेच जनतेने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही तयार आहोत असं नितेश राणेंनी सांगितले.