"देवेंद्र फडणवीस एका चेंडूत चार विकेट काढणार; मिठी नदीतील घाणीचा लवकरच उलगडा होणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:18 PM2021-04-06T16:18:48+5:302021-04-06T16:22:19+5:30
सचिन वाझे यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्यांचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल. एनआयए लवकरच मिठी नदीतील घाणीचा उलगडा करेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.
मुंबई: परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने माजी अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे सीबीआयला आदेश दिले. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई हायकोर्टानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं. मी सरकारशी संबंधित व्यक्त नाही आणि न्यायालयाशी निगडीत निर्णयावर मी काही बोलणं योग्य ठरणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या भूमिकेवरुन भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत हे स्वत:च्या मर्जीनुसार शिवसेनेचे प्रवक्तेपद मिरवतात. त्यांना वाटतं तेव्हाच ते प्रसारमाध्यमांना उत्तरं देतात, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट काढणार आहेत. लवकरच आणखी काही चेहरे समोर येतील, असा इशारा देखील प्रसाद लाड यांनी दिला आहे. सचिन वाझे यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्यांचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल. एनआयए लवकरच मिठी नदीतील घाणीचा उलगडा करेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.
सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाही, जे समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. #AnilDeshmukh#UddhavThackeray#BJPhttps://t.co/atBeDfJXIg
— Lokmat (@MiLOKMAT) April 6, 2021
काय होता परमबीर सिंगाचा आरोप?
मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्टॉरंट आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता.
राजीनामा पत्रात अनिल देशमुख काय म्हणाले?
मा.ना. श्री. उद्धव ठाकरेसाहेब,
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत आज दि. ५ एप्रिल रोजी पारित केलेल्या आदेशान्वये अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या उचित वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. मला मंत्री (गृह) पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.
आपला नम्र,
अनिल देशमुख
शरद पवारांचे विश्वासू शिलेदार नवे गृहमंत्री
अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे सातव्यांदा आमदार आहेत. याआधी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्रिपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे.