Join us  

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:00 PM

Prasad Lad : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. 

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपच्या आमदाराला धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. 

एका अज्ञात फोन नंबरवरून प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून एका अज्ञात फोन नंबरवरून धमकीचे फोन येत आहे. दरम्यान, प्रसाद लाड यांनी आपल्याला धमकीचे फोन आले असल्याची तक्रार मुंबईच्या गुन्हे शाखेकडे केली आहे. सतत दोन दिवसापासून फोन येत असल्याने लाड यांनी गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये माझा जिवाला धोका असल्याची भिती प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे. तसेच, या चौकशीसाठी सीडीआर काढण्यास माझी हरकत नाही, असे प्रसाद लाड यांनी पत्रात म्हटले आहे. या धमकी प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा काल जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी अत्यंत अश्लिल भाषेत पत्र लिहून धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबतच जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसे संकेतही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एकंदरीत ज्या पद्धतीने गेल्या आठवडाभरापासून घडामोडी घडत आहेत, त्या पाहता पडद्यामागून भाजपच या बंडखोरांना पाठिंबा देत असल्याची चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :प्रसाद लाडगुन्हेगारीभाजपा