Join us

"उद्धव ठाकरेंनी बिहार पोलिसांना रोखले, सुशांतच्या घरातले फर्निचर काढलं"; राम कदमांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:59 IST

सुशांत सिंह प्रकरणावरुन राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Ram Kadam on Sushant Singh Rajput Death Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने मुंबई कोर्टात दाखल केला आहे. सुशांत सिंह राजपूतचा २०२० मध्ये मृत्यू झाला होता. तब्बल ४ वर्षे ४ महिन्यांनंतर सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. क्लोजर रिपोर्टमध्ये सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लीन चिट दिली. सीबीआयच्या तपासानुसार सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला कोणीही जबाबदार धरलेलं नाही. मात्र यावरुन अद्यापही राजकारण सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी याप्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या सीबीआयने शनिवारी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी कट रचल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं अहवालात म्हटलं. त्यामुळे सीबीआयने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन खटले बंद केले आहेत. मात्र भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या प्रकरणात ठाकरे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतं आणि  बिहार पोलिसांना मुंबईत चौकशी करण्यापासून रोखले गेले, असे राम कदम यांनी म्हटलं.

"जेव्हा संपूर्ण देश सुशांत सिंह राजपूतचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करत होता, तेव्हा उद्धव ठाकरे सरकारने जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला. बिहार पोलीस जेव्हा मुंबईत चौकशीसाठी आले तेव्हा त्यांनाही थांबवण्यात आले. कारण काय होते? उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्या लोकांना वाचवण्यासाठी सर्व पुरावे पुसून टाकले. सुशांतच्या घरातील फर्निचर काढून टाकण्यात आले. तिथे रंगकाम करण्यात आलं ते मूळ मालकाला परत देण्यात आलं," असा आरोप राम कदम यांनी केला.

"जेव्हा तुम्ही सर्व पुरावे नष्ट करता, तुमचे नेते रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते म्हणून उभे राहतात तेव्हा या सगळ्याचा अर्थ काय? दिशा सालियनच्या वडिलांना त्यांच्या मुलीला न्याय मिळाला नाही असे वाटण्याचे कारण काय आहे. या सर्वांमागे उद्धव ठाकरे सरकार आणि त्यांच्या जवळच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. जर उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले असते तर सुशांतच्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळाला असता. जर आज त्यांना न्याय मिळत नसेल तर यासाठी जबाबदार उद्धव ठाकरे सरकार आहे," असंही राम कदम म्हणाले. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतउद्धव ठाकरेराम कदमगुन्हा अन्वेषण विभाग