Join us

मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू; भाजपा आमदार राम कदमांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 2:28 PM

वादग्रस्त विधानावर ठाम असल्याचं कदम म्हणाले

मुंबई: तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल, तर तिला पळवून आणण्यास मदत करू, असं वादग्रस्त विधान भाजपा आमदार राम कदम यांनी केलं आहे. मुलाला मुलगी पसंत असेल, त्याच्या आई-वडिलांनादेखील ती मुलगी पसंत असेल, तर चुकीचं असेल तरी आपण त्या मुलीला पळवून आणू, असं राम कदम यांनी म्हटलं. या विधानाबद्दल त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. मी माझ्यावर विधानावर ठाम असल्याचं राम कदम यांनी सांगितलं. 

भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.

राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाविषयी एका वृत्तवाहिनीनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राम कदम त्यांच्या विधानावर ठाम होते. आपण या विधानाबद्दल माफी मागणार नसल्याचं ते म्हणाले. 'पालकांना दुखावू नका. त्यांची संमती असेल, तर माझ्याकडे या. लग्न करताना आई-वडिलांचा विचार नक्की घ्या. पालकांची परवानगी असेल, तर पळवून नेण्याचा प्रश्न येतोच कुठे?', असा प्रतिप्रश्न कदम यांनी केला. 

टॅग्स :राम कदमभाजपादही हंडी