मुंबई: लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद करतो, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. माझं विधान अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचं खापर विरोधकांवर फोडलं आहे.
काय म्हणाले होते राम कदम?भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.