Join us

शिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल- सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 9:53 AM

संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात शनिवारी मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळ तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

मुंबई: शिवसेनेने भाजपाशी असलेली युती मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची केलेल्या स्थापनेदरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि सामनामधील अग्रलेखांमधून तसेच पत्रकार परिषदेमधून बोचरी टीका करत भाजपाला जेरीस आणणारे शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात शनिवारी मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळ तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

मुंबईतल्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना संजय राऊत आणि आशिष शेलार हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. मात्र, संजय राऊत यांच्या गेल्या काही आठवड्यांमधील भेटींचा सिलसिला पाहताना या भेटीमुळे चर्चेलाही उधाण आलं आहे. या भेटीवर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यात भाजपाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. 

सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, भाजपा शिवसेनेसोबत जाण्याचा प्रयत्न करणार नाही. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते परततील, तेव्हा भाजपा विचार करेल, असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाच्या युतीबाबत राज्यात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. 

दरम्यान,  मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले आहे.

दरम्यान, या संदर्भात भाजपाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीबाबत मोघम प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही भेट राजकीय नसावी, तर ती सदिच्छा भेट असावी, असा दावा त्यांनी केला आहे. या भेटीत काही राजकीय संदर्भ आहेत का याबाबत पक्षीय पातळीवर माझ्याकडे काही माहिती नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेसुधीर मुनगंटीवारशिवसेनाभाजपासंजय राऊतआशीष शेलार