Join us

भाजप आमदाराने राज्यपालांच्या नावे काढले खोटे आदेश; जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 5:37 AM

माजी राज्यमंत्री व विद्यमान भाजप आमदारांनी राज्यपालांच्या नावाचा गैरवापर करत पुण्यातील पाषाण भागात ललितकुमार जैन या बिल्डरला खोटी कागदपत्रे करुन दिली.

मुंबई : माजी राज्यमंत्री व विद्यमान भाजप आमदारांनी राज्यपालांच्या नावाचा गैरवापर करत पुण्यातील पाषाण भागात ललितकुमार जैन या बिल्डरला खोटी कागदपत्रे करुन दिली. त्यामुळे जैन यांनी त्या जागेवर भव्य इमारत उभी करून कोट्यवधींची कमाई केली, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.नगरविकास विभागाने १० आॅक्टोबर २०१८ रोजी आम्ही असा आदेशच काढला नाही, असे म्हटले असून अभिलेख कक्षातील रेकॉर्ड पाहता असा कोणताही आदेश अभिलेख कक्षात जमा नाही. याचाच अर्थ सदर बोगस आदेश तत्कालिन राज्यमंत्री १३ आॅगस्ट १९९८ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशाने व नावाने पारीत केला असून ‘ते’ पत्रच आ. पाटील यांनी माध्यमांना दिले.राज्य शासनाचा प्रत्येक आदेश किंवा लेख यावर सचिव, अप्पर सचिव, सहसचिव, उपसचिव, अव्वल सचिव, सहायक सचिव किंवा त्याबाबतीत ज्यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत अशांनी सही केली पाहिजे. कार्य नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.सदर आदेश खोटा असल्याचे शासनाने कबूल केले असल्याने मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक वारजे पोलिस ठाणे येथे पुणे माहिती अधिकारातील कार्यकर्त्याने आ. राज पुरोहित, प्रकाश पाषाणकर, ललितकुमार जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली; मात्र २६ जून १९ रोजी वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षक खांडेकर यांनी प्राधिकारी यांच्या लेखी तक्रारी शिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही असे सांगितल्याचे आ. पाटील यांनी या वेळी सांगितले.असे आहे नेमके प्रकरणपाषाण गावातील सर्व्हे नंबर १३८ क्षेत्र - ७ लाख ५१ हजार ३२७ चौरस फूट जागा नामदेव धोंडीबा पाषाणकर यांच्या मालकीची होती. शासनाने ३१ जानेवारी ८९ रोजी पाषाणकर यांना गृहयोजना राबवण्यास मंजूरी दिली. पाषाणकरांकडे आर्थिक पाठबळ नसल्याचा गैरफायदा घेवून कुमार बिल्डर्सचे मालक ललितकुमार जैन यांनी करारनामा व कुलमुखत्यारपत्र लिहून घेतले. त्यानंतर राज पुरोहित यांनी मंत्री नसताना संगनमत करुन सही शिक्क्यांने जमीन बिन अतिरिक्त घोषित असल्याचे आदेश प्राप्त केले.

टॅग्स :जयंत पाटीलमहाराष्ट्र सरकार