Join us

वारिस पठाणांच्या 'त्या' चिथावणीखोर विधानावरुन भाजपा, मनसेचा आक्रमक पवित्रा, म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 4:45 PM

वारिस पठाण यांनी कर्नाटकच्या गुलबर्गा येथे वादग्रस्त विधान केलं त्यावरुन अनेक स्तरातून टीका होत आहे.

ठळक मुद्देसीएए, एनआरसी कायद्याविरोधातील आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होतोय का?एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर भाजपा, मनसे आक्रमक आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत, भाजपाचं प्रत्युत्तर

मुंबई - सीएए आणि एनआरसीविरोधात आयोजित केलेल्या सभेत एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी आहोत, आतापर्यंत महिला बाहेर आल्यात तर तुम्हाला घाम फुटला आहे आम्ही आलो तर काय होईल समजून घ्या असा इशारा दिला आहे. मात्र या विधानावरुन भाजपा, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

याबाबत बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणाले की, वारिस पठाण यांचं भाषण देशविघातक आहे, त्यांनी आव्हान देण्याचं काम करु नये, आंदोलनाच्या माध्यमातून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, वारीस पठाण यांचे बापजादे आले तरी भारी पडण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही, त्याचसोबत आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत, इथल्या देशातला नागरिक स्वस्थ बसणार नाही, खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी वारिस पठाण यांना दिला आहे. 

तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून काही लोकांना कंठ फुटायला लागले आहेत, कर्नाटकात भाजपाचं सरकार आहे त्यांनी तिथल्या तिथे कठोर कारवाई वारिस पठाण यांच्यावर करायला हवी अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. यापूर्वीही एमआयएमचे नेते अकबरउद्दीन औवेसी यांनी हैद्राबादमध्ये १५ मिनिटे पोलीस हटवा, मग बघा असं भाषण केले होते. त्यावेळी त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. सीएए, एनआरसी कायद्याविरोधातील आंदोलनात मुस्लीम, दलित, आदिवासी संघटनाही असताना याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्यावेळी वारिस पठाण भाषण करत होते त्यावेळी असदुद्दीन औवेसीही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनीही वारिस पठाण यांच्या भाषणावर स्पष्टीकरण दिलं नाही. 

दरम्यान, वारिस पठाण यांनी केलेलं वक्तव्य अतिशय जहरी आहे, वारंवार ही मंडळी अशी विधान करतात, सर्व आंदोलन शांततेत होत असताना कुठेही गालबोट लागले नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक आहे, सरकार लोकांचे म्हणणं ऐकून घेत आहे, अशा स्थितीत वारीस पठाण भडकवण्याचे काम करतायेत, हे देशविघातक आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, राज्य सरकार यावर कठोर पाऊल उचलेल असा विश्वास शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी व्यक्त केला. 

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

Video: 'या' मुस्लीम मुलीचं शिवरायांवरील भाषण ऐकून अंगावर शहारा येईल; सोशल मीडियात कौतुक

आता 'रामायण एक्स्प्रेस' धावणार, प्रवाशांना घेता येणार भजन-कीर्तनाचा आनंद!

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शशी थरूरही आग्रही; संदीप दीक्षितांचे केले समर्थन

शिवसेनेच्या 'या' नेत्याची मागणी; 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेचं चित्रीकरण थांबवा अन्यथा...

टॅग्स :ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनवारिस पठाणमुस्लीममनसेभाजपाशिवसेना