दहीहंडीवरील निर्बंधाविरोधात मनसे, भाजपा झाले आक्रमक; उत्सव साजरा करण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 07:26 AM2021-08-31T07:26:42+5:302021-08-31T07:26:50+5:30

प्रतिबंधानंतरही उत्सव साजरा करण्यावर ठाम

BJP, MNS became aggressive against restrictions on Dahihandi pdc | दहीहंडीवरील निर्बंधाविरोधात मनसे, भाजपा झाले आक्रमक; उत्सव साजरा करण्यावर ठाम

दहीहंडीवरील निर्बंधाविरोधात मनसे, भाजपा झाले आक्रमक; उत्सव साजरा करण्यावर ठाम

googlenewsNext

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार हे हिंदूच्या भावना पायदळी तुडविणारे सरकार आहे, असा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे, तर राज्यातील ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का, असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. सरकारने कितीही प्रतिबंध केला तरी दहीहंडीचा उत्सव साजरा करणारच, असा इशारा मनसे आणि भाजप नेत्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमांसह दहीहंडी खेळता आली असती. थर आणि उपस्थितीबाबत मर्यादा, वयाचे बंधन घालता आले असते. सगळ्यांनी ते मान्यही केले असते; पण सणच साजरे करायचे नाहीत, ही राज्य सरकारची भूमिका चुकीची आहे, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे. 

महाराष्ट्रात सगळ्या हिंदू सणांवरच इतके निर्बंध लागू का केले जात आहेत, राज्यातील ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येत आहेत का, असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवरील सुनावणीत तत्कालीन सरकारला दहीहंडीच्या थरांच्या उंचीवर मर्यादा घालण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा शिवसेनेने मोठा गोंधळ घातला होता.

भारतात सण-उत्सवांवर असे निर्बंध लादले गेले तर आम्ही पाकिस्तानात जाऊन दहीहंडी साजरी करायची का, अशी ओरड शिवसेनेने केली होती. मात्र आता ठाकरे सरकारने दहीहंडीवर बंदी घातली आहे. शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करत आहे. थरांची उंची व गर्दीबाबतचे निर्बंध पाळून दहीहंडी साजरी करण्यालादेखील सरकारने परवानगी नाकारल्याचे शेलार म्हणाले. बंदीनंतर भाजपने दहीहंडीचा उत्सव प्रतीकात्मकपणे साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला.

ठाण्यात नाेटिसांना न जुमानता उत्सव साजरा करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा 

शासन आदेशाचे उल्लंघन करून मनसेने दहीहंडी साजरी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावूनही त्यांनी रविवारपासून भगवती शाळेच्या मैदानात दहीहंडीची तयारी सुरू केली होती. सोमवारी स्टेज बांधणीचे काम सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी येऊन ते काम बंद पाडून अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करताच जाधव यांनी मनसैनिक म्हणजे नारायण राणे यांचे कार्यकर्ते नाहीत, असे सांगून मंगळवारी उत्सव जाहीर करणारच असे सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी खबरदारी म्हणून ठाणे पोलिसांनी शहरातील ११२ गोविंदा पथकांना नोटिसा बजावल्या असून, यात परिमंडळ एकमधील ६४ आणि परिमंडळ पाच क्षेत्रांतील ४८ पथकांचा समावेश आहे. मात्र, ठाण्यातील गोविंदा पथकांनी आम्ही उत्सवात सहभागी होणार नसून, शासन नियमांचे पालन करणार असल्याचे सांगितल्याने उद्या होणाऱ्या उत्सवाकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

मनसेने फोडली निषेधाची हंडी

सरकारने दहीहंडी उत्सवावर निर्बंध घालूनदेखील जन्माष्टमीनिमित्त घाटकोपरच्या भटवाडी येथे मनसेच्या वतीने सोमवारी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोविंदांनी ५ थर रचून ही दहीहंडी फोडली. थरामध्ये असणाऱ्या सर्व गोविंदांनी मास्क घातला होता. यावेळी मनसेच्या वतीने सरकारच्या निर्णयाचा निषेध करत, आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असे सांगण्यात आले.

Web Title: BJP, MNS became aggressive against restrictions on Dahihandi pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.