रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात आता मुलुंडमध्ये भाजप, मनसेचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:55 IST2025-03-26T14:55:18+5:302025-03-26T14:55:41+5:30
पालिकेचे अगरवाल हॉस्पिटलही वादाच्या भोवऱ्यात; नूतनीकरण झालेल्या वास्तूच्या लोकार्पणाची मागणी

रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात आता मुलुंडमध्ये भाजप, मनसेचा आक्रमक पवित्रा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा आरोप होत असतानाच मुलुंड येथील पालिकेचे अगरवाल रुग्णालयही आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव पालिकेने आखल्याचा आरोप करत भाजप आणि मनसेने त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन रुग्णालयातील शेवटच्या टप्प्यातील कामे पूर्ण करून रुग्णालयाचे लोकार्पण करावे, अशी मागणी केली. रुग्णालयाचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणीसाठी पक्षातर्फे ७ वर्षे पाठपुरावा सुरू असून, त्यासाठी उपोषणदेखील करण्यात आले आहे. मात्र, आता या रुग्णालयाचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पालिकेने एवढा निधी खर्च करून रुग्णालयाची पुनर्बांधणी केली आणि आता ते नव्याने सुरू करण्याची वेळ आली तेव्हा खासगी संस्थेला चालवायला देणे, हे अयोग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पुनर्बांधणीपूर्वी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग जेव्हा खासगी संस्थेला चालवायला देण्यात आला होता, तेव्हाचा सावळा गोंधळ प्रशासनाने पाहिला होता. त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नसायचे, कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही नियमांचे पालन होत नव्हते. या विभागात सर्व मनमानी कारभार सुरू होता. गेल्या काही वर्षांपासून येथील रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
...तर गरीब रुग्णांचे हाल
दोन वर्षांपूर्वी अतिदक्षता विभागात डॉक्टर उपलब्ध नसल्याने काही रुग्णांचा मृत्यूही झाला. त्यामुळे रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास तेथे उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
रुग्णालयाचे खासगीकरण तातडीने थांबवावे आणि डॉक्टर्सची भरती करावी, असेही गंगाधरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
मनसेची स्वाक्षरी मोहीम
हा खासगीकरणाचा घाट कुणाच्या सांगण्यावरून घातला जात आहे, असा सवाल करत मनसेने याविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे. हे खासगीकरण झाल्यास मनसे स्टाइलने धडा शिकवू, असा इशाराही दिला आहे.