मुंबई – आर्यन खान प्रकरणात NCB नं केलेल्या कारवाईनंतर मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरु केली. वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्र दाखवत नोकरी मिळवली तसेच वानखेडे दहशत पसरवून वसुली करत असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यांवरही गंभीर आरोप लावले. त्यानंतर आता या प्रकरणात नवीन वळण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असलेले पुरावे देणार असं म्हटलं होतं. मात्र तत्पूर्वीच भाजपाचे मोहित भारतीय यांनी दाऊदचा हस्तक राज्याच्या सह्याद्री गेस्ट हाऊसवर आल्याचा आरोप करत तत्कालीन मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप लावले. मोहित भारतीय यांनी याबाबतचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. त्यात अनिल देशमुख यांच्यासोबत दाऊदचा हस्तक असल्याचा दावा केला.
मोहित भारतीय म्हणाले की, जानेवारी २०२१ मध्ये चिंकू पठाण हा म्याव म्याव ड्रग्सचा सर्वात मोठा डिलर असल्याचं म्हटलं जातं. याला अटक केली तेव्हा सगळीकडे बातम्या आल्या. चिंकू पठाण हा दाऊदचा हस्तक आहे. मात्र हाच टिंकू पठाण राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी कोविड काळात सह्याद्री अतिथीगृहावर गेला होता. मंत्री चिंकू पठाणसोबत काय करत होते? त्या भेटीवेळी सुनील पाटील, एका मंत्र्याचा जावईही उपस्थित होते. गृहमंत्र्यांना भेटणारी माणसं कोण होती? महाराष्ट्रात ड्रग्स मोहिमेला चालना देण्याचं काम राष्ट्रवादी नेते, मंत्री करत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्याला बदनाम करण्याचं काम मंत्र्यांनीच केले
आर्यन खानला(Aryan Khan) छापेमारीवेळी पकडलं. तेव्हा जे फोटो आले ते किरण गोसावीने सुनील पाटीलला पाठवले. त्यानंतर सुनील पाटीलने हे फोटो मंत्र्यांना पाठवले. जे केंद्रावर प्रश्न विचारतात. ते मंत्रिपदाचा गैरवापर करून षडयंत्र रचून राज्याला बदनाम करत आहेत. या प्रकरणाची NIA चौकशी व्हावी. ड्रग्सच्या माध्यमातून आलेला पैसा देशाविरोधी वापरला जातोय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.