Join us

‘हॉटेल ललित’मध्ये सगळं षडयंत्र रचलं; नवाब मलिकांविरोधातील दाव्यानं प्रकरणाला वेगळं वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 1:06 PM

Mohit Bhartoya Allegation on Nawab Malik: या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. शाहरुख खानकडून खंडणी मागण्याचाही काही मंत्र्यांचा डाव असेल असा दावा त्यांनी केला.

मुंबई – समीर वानखेडे प्रकरणात सातत्याने आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी दिवाळीनंतर आणखी एक गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितले. काही दिवसांपूर्वी मलिकांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत हॉटेल ललितमधलं रहस्य बाहेर येणार असं म्हटलं. तत्पूर्वी भाजपाचे मोहित भारतीय यांनी मलिकांवर गंभीर आरोप केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपाला(BJP) बदनाम करण्यासाठीच हे षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.

मोहित भारतीय(Mohit Bhartiya) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मागील ८ महिन्यापासून ललित हॉटेलमध्ये सुनील पाटील नावाने एक सूट बुक असायचा. त्याठिकाणी राष्ट्रवादीचे कोणकोणते मंत्री त्याठिकाणी शराब, शबाब आणि कबाबमध्ये सहभागी व्हायचे?. ऋषिकेश देशमुख ललित हॉटेलमध्ये काय करायचे? नवाब मलिकांनी (Nawab Malik) राज्यातील जनतेला याचे उत्तर द्यावं. राज्यात ड्रग्स पेडलर, ड्रग्स माफियांना शरण देण्याचं काम करायचं आहे का? ड्रग्समधून आलेला पैसा देशविरोधी कारवायांसाठी वापरायचा आहे का? असा प्रश्नही मोहित भारतीय यांनी विचारला आहे.

तसेच प्रभाकर साईल, मनिष भानुशाली यांना कुठे गायब केले? हे सगळं रॅकेट आहे. किरण गोसावी कोणत्या मंत्र्याला एक्सपोज करण्याची भाषा करत होते? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. शाहरुख खानकडून खंडणी मागण्याचाही काही मंत्र्यांचा डाव असेल असा दावा त्यांनी केला. मंत्री या प्रकरणात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. SIT या प्रकरणाची सत्यता बाहेर आणेल ही अपेक्षा. मयूर कोणत्या मंत्र्याचा जावई म्हणून पुढे आला? हा मयूर कोण आहे? हे सगळं प्रकरण संवेदनशील आहे. कॉल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन ट्रेस करुन सगळा तपास करावा. या प्रकरणाची चौकशी आवश्यक आहे. ३ तारखेला आर्यनला ताब्यात घेतले, ४ तारखेला अटक केली. ६ तारखेला भाजपासोबत किरण गोसावी आणि मनीष भानुशाली यांचे संबंध असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितले. ३६ तासांत नवाब मलिकांनी सगळे पुरावे कसे एकत्र केले? हे सगळे एकत्र होते. प्रभाकर साईल, किरण गोसावी, मंत्री एकत्र होते असा आरोप मोहित भारतीय यांनी केला.

तसेच किरण गोसावी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचा जबाब अद्याप पुढे का आला नाही? सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचं नातं काय? ललित हॉटेलमध्ये नवाब मलिक सुनील पाटीलसोबत काय करायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरं नवाब मलिकांनी द्यावी असं सांगत या प्रकरणाला वेगळंच वळण आणलं आहे. दरम्यान मोहित भारतीय यांनी केलेले आरोप फेटाळत उद्या पत्रकार परिषदेत सत्य सगळ्यांसमोर आणणार असं मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत.  

टॅग्स :नवाब मलिकभाजपासमीर वानखेडे