मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी NCB अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. समीर वानखेडे वसुलीसाठी कारवाई करत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून वसुली केली जात असल्याचं आरोपात म्हटलं आहे. नवाब मलिकांनी(Nawab Malik) काही दिवसांपूर्वी निनावी पत्र ट्विटरवर शेअर करत वानखेडेंविरोधात स्पेशल २६ प्रकरणात अनियमिततेचे दावे केले होते. आता या पत्रावर भाजपा नेते मोहित भारतीय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
हे पत्र ज्या लिफाफ्यातून आले होते त्यावर पोस्टल स्टॅम्प सगवट, बेगूसराय, बिहारचा उल्लेख होता. हे पत्र बनावट असल्याचं मोहित भारतीय(BJP Mohit Bhartiya) यांनी सांगितले. मोहित म्हणाले की, नवाब मलिकांनी दावा केला होता की, मुंबईत NCB मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने हे पत्र त्यांना पाठवलं. परंतु या निनावी पत्राचा लिफाफा पाहिला तर त्यावर बिहारचा स्टॅम्प आहे. मलिक यांनी स्वत: बनावटपणे हा स्टॅम्प लावून पत्र तयार केले होते असा दावा त्यांनी केला.
याबाबत आता NCB अधिकारी आणि चीफ पोस्ट मास्टर जनरल यांना मोहित भारतीय यांनी पत्र पाठवलं आहे. या पत्राबाबत संशय निर्माण झाला असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर निनावी पत्राच्या आधारे कुठल्याही प्रकारची तपासणी करण्यात NCB ने नकार दिला आहे. मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना मंत्रिपदावरुन निलंबित करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यनला क्रुझ ड्रग्ज पार्टीवेळी(Mumbai Cruise Drugs Party) छापेमारी करताना अटक केली. त्यानंतर या प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने २५ कोटींची डील झाल्याचा दावा केला. त्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते असं म्हटलं. NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर लागलेल्या आरोपाबाबत पोलिसांनी एक समितीची स्थापना केली आहे. त्याची जबाबदारी पोलीस अधिकारी मिलिंद खेतले यांच्यावर सोपवली आहे. ड्रग्ज प्रकरणात ४ पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी कुठलाही गुन्हा नोंदवला नाही. पोलिसांकडे फक्त तक्रारी आल्या आहेत. वानखेडे यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीची शहानिशा केली जाईल. त्यानंतर तपास अधिकारी अहवाल गृह मंत्रालयाला पाठवतील. त्यानंतर पुढील आदेश घेऊन कार्यवाही केली जाईल असं सांगण्यात येत आहे.