नवाब मलिक यांच्याविरोधात मोठा गौप्यस्फोट; कोण आहे सुनील पाटील?; भाजपानं थेट पुरावेच दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 11:44 AM2021-11-06T11:44:03+5:302021-11-06T11:49:19+5:30

सुनील पाटील याला पुढे करून राज्य सरकारच्या मंत्र्यांनी NCB विरुद्ध षडयंत्र रचलं गेले. सुनील पाटील यांच्यासोबत काय संबंध आहेत? याचे उत्तर राज्यातील जनतेला द्यायला हवं.

BJP Mohit Bhartiya Target Minister Nawab Malik over Mumbai Cruise NCB Drugs Case | नवाब मलिक यांच्याविरोधात मोठा गौप्यस्फोट; कोण आहे सुनील पाटील?; भाजपानं थेट पुरावेच दाखवले

नवाब मलिक यांच्याविरोधात मोठा गौप्यस्फोट; कोण आहे सुनील पाटील?; भाजपानं थेट पुरावेच दाखवले

googlenewsNext

मुंबई – समीर वानखेडे प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत आहेत. त्याचसोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखालीच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला. त्यानंतर आता नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपाचे मोहित भारतीय यांनी पत्रकार परिषद घेत घणाघाती आरोप केलेत. मलिक यांनी NCB च्या कारवाईवर जे प्रश्नचिन्ह उभे केलेत त्यामागे मोठं षडयंत्र असल्याचं मोहित भारतीय म्हणाले.

मोहित भारतीय म्हणाले की, सुनील पाटील हा सर्व प्रकरणाचा मास्टर माईंड आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखचा मित्र आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीबाबत सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यात व्हॉट्सअप संवाद झाला होता. अनिल देशमुख प्रकरणातही सुनील पाटीलचा समावेश आहे. किरण गोसावी हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं गेले. परंतु किरण गोसावीचा नंबर सुनील पाटील यानेच सॅम डिसुझाला दिला होता. सुनील पाटीलच्या सांगण्यावरुनच किरण गोसावी याला व्ही.व्ही सिंग या अधिकाऱ्याला भेटवलं. किरण गोसावी हा मंत्री नवाब मलिकांचा माणूस असल्याचं  त्यांनी सांगितले.

तसेच सुनील पाटील याला पुढे करून राज्य सरकारच्या मंत्र्यांनी NCB विरुद्ध षडयंत्र रचलं गेले. सुनील पाटील यांच्यासोबत काय संबंध आहेत? याचे उत्तर राज्यातील जनतेला द्यायला हवं. राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सुनील पाटीलची भूमिका काय? एखाद्या अधिकाऱ्याला बदनाम करुन महाराष्ट्रात ड्रग्स माफियांना मोकळं वातावरण करुन द्यायचा कोणाचा डाव आहे? सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यात ऑगस्टमध्ये संवाद झाला होता. सुनील पाटीलचा एक ऑडिओ क्लीप माझ्याकडे आला. ते मी तपास यंत्रणेकडे पाठवलं आहे. राज्यात बदलीचं रॅकेट सुनील पाटील चालवतो. मंत्र्यांनी ब्लॅकमेलिंगचं रॅकेट चालवून अधिकाऱ्यांना बदनाम केले गेले. केंद्रीय तपास यंत्रणा, भाजपाची प्रतिमा मलीन करण्यासाठी मागील काही दिवसांपासून हे आरोप लावले गेले असं मोहित भारतीय यांनी दावा केला. नवाब मलिक, सुनील पाटील यांचे कॉल रेकॉर्ड सर्वांसमोर आणावे सगळं सत्य बाहेर येईल असंही मोहित भारतीय म्हणाले.

किरण गोसावी, मनिष भानुशाली हे दोघंही सुनील पाटीलचे खास मित्र आहेत. खोटं बनावट चित्र तयार करून केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं. सुनील पाटील याने सॅम डिसुझा आणि किरण गोसावी यांची ओळख केली. या षडयंत्रामागे वसुली करायची होती का? देशाची दिशाभूल करुन पुराव्याशिवाय आरोप लावले गेले. विश्वासर्हता गमावलेल्या मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का? त्यांच्या ३ हजार कोटींच्या बेनामी संपत्तीचं यंत्रणा चौकशी करतील. परंतु त्यांनी जे आरोप केलेत त्याचे स्पष्टीकरण द्यायला हवं. नवाब मलिकांचे ड्रग्स पेडलरसोबत काय संबंध आहेत? हे लोकांसमोर आणलं जावं अशी मागणी मोहित भारतीय यांनी केली.   

 

Web Title: BJP Mohit Bhartiya Target Minister Nawab Malik over Mumbai Cruise NCB Drugs Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.