Hindustani Bhau : "हिंदुस्थानी भाऊची सुटका करा, अन्यथा आम्हीही आदोलनात उतरू," मोहित कंबोज यांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 04:58 PM2022-02-01T16:58:13+5:302022-02-01T16:59:02+5:30
दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील व्हिडीओनंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊला अटकही करण्यात आली होती.
दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच या आंदोलनाच्या स्थळासह वेळेबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. परंतु आता भाजपच्या मोहित कंबोज यांनी हिंदुस्थानी भाऊला झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय.
"विद्यार्थ्यांच्या विषयावरुन हिंदुस्थानी भाऊनं सरकार समोर गोष्ट मांडली. मला असं वाटतं विद्यार्थी हे भविष्य आहेत आणि त्यांच्यासोबत काही अन्याय होत असेल, त्यांचा आवाज कोणी सरकारसमोर मांडत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं चुकीचं आहे. ज्या प्रकारे गुन्हा दाखल करुन हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली, हे नीदनीय कार्य महाराष्ट्र सरकारनं केलं आहे," असं मोहित कंबोज म्हणाले.
We Support Students Who Are Future Of Nation .
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 1, 2022
Arrest Of #hindustanibhau is Illegal And Should Be Released Soon . #MahaVikasAghadi Government Has Become #Intolerant . pic.twitter.com/AvzNQaHGBL
"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: या घटनेची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हिंदुस्थानी भाऊला सोडलं पाहिजे. विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहेत. त्यांच्यासोबत कोणता अन्याय झाला किंवा आंदोलन करणं, मोर्चा काढणं हा जर राज्यात गुन्हा ठरत असेल तर देशात, राज्यात सरकार असहिष्णू झालंय यापेक्षा मोठी कोणतीही बाब असू शकत नाही. हिंदुस्थानी भाऊची लवकरात लवकर सुटका झाली पाहिजे. जर असं झालं नाही, तर आम्ही सर्व आंदोलनात उतरू," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.