“संजय राऊत यांना क्रेडिट-डेबिट काय हे माहिती आहे का?”; भाजपची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:55 PM2022-04-27T22:55:32+5:302022-04-27T22:56:23+5:30
ते ८० लाख रुपये घेतले आहेत की दिले आहेत, हे संजय राऊत यांना माहिती आहे का, अशी विचारणा भाजपने केली आहे.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेला गोंधळ आणि कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला आहे. नवनीत राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित आणि ईडीनं अटक केलेल्या युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतले होते. याप्रकरणात नवनीत राणा यांची कोणतीही चौकशी झालेली नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. मात्र, यावरून आता भाजपने संजय राऊत यांच्यावर टीका केली असून, संजय राऊतांना क्रेडिट-डेबिट काय हे माहिती आहे का, अशी खोचक विचारणा केली आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत यांना क्रेडिट आणि डेबिट काय आहे हे माहिती आहे का? ते पैसे का दिले आहेत ते माहिती आहे का? ते ८० लाख रुपये घेतले आहेत की दिले आहेत? असे प्रश्न मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना विचारले आहेत. युसुफ लकडावाला हे एक बिल्डर आहेत आणि राणा दाम्पत्यांनी काही वर्षांपूर्वी लकडावाला यांच्याकडून ती विकत घेतली आहे. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर जे आंदोलन केले होते ती इमारत लकडावाला यांनी बांधलेली आहे, असे कंबोज यांनी म्हटले आहे.
युसूफ लकडावाला संजय राऊत यांचे मित्र
संजय राऊत हे अत्यंत खालच्या पातळीच राजकारण करत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर आरोप लावत आहेत. युसुफ लकडावाला ची तुलना त्यांनी एजाज लकडावाला सोबत केली. युसूफ लकडावाला हे संजय राऊत यांचे मित्र आहेत ते शरद पवारांचे मित्र आहेत. राजीव गांधीपासून त्यांचे सर्व मित्र आहेत. युसूफ लकडावाला यांच्यावर काही वर्षांपूर्वी इओडब्ल्यू कडून गुन्हा दाखल झाला होता. हेच संजय राऊत युसूफ लकडावाला यांच्या महाबळेश्वर येथील एवरशाइन हॉटेलमध्ये नाव बदलून तिकडे राहत होते त्यांच्याकडून सल्लामसलत घ्यायचे. हयात नसलेल्या व्यक्तींवर खोटे आरोप लावणे संजय राऊत यांनी थांबवावे, असा सल्ला कंबोज यांनी संजय राऊतांना दिला आहे.
दरम्यान, यापूर्वी एक ट्विट करत मोहित कंबोज यांनी शरद पवार आणि लकडावाला याचे फोटो शेअर केले. त्यापैकी एका फोटो निळा कोट परिधान केलेला युसूफ लकडावाला असून त्याच्या बाजुला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत, असा दावा कंबोज यांनी केला आहे. तसेच, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासमेवतचाही युसूफ लकडावाला यांचा फोटो कंबोज यांनी शेअर केला आहे. त्यामुळे, याप्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. लवंडे संजय राऊत या फोटोवर काय म्हणतील? असा सवालही कंबोज यांनी विचारला आहे.