Mohit Kamboj: मुंबई महापालिकेच्या नोटिसीला मोहित कंबोज यांनी दिले उत्तर; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 10:48 PM2022-04-12T22:48:11+5:302022-04-12T22:48:42+5:30
मुंबई महापालिकेने कारवाई केली तर ती चुकीची ठरेल, असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.
मुंबई: आताच्या घडीला महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची धार वाढत जाताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेने भाजप नेत्यांच्या घरावर कारवाई करण्यावरूनही भाजप शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. यातच आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिसीला थेट उत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या सांताक्रुझ (प.) येथील खुशी प्राईड ब्लमोडो इमारतीची मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेतीन तास कसून झाडाझडती घेतली. त्यांच्या मालकीच्या चार मजल्यांसह पूर्ण १४ मजली इमारतीच्या प्रत्येक भागाची, मूळ नकाशाप्रमाणे बांधकाम झाले आहे का, याची पडताळणी करण्यात आली. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर महापालिकेने बजावलेल्या नोटिसीला मोहित कंबोज यांनी उत्तर दिले आहे.
महापालिकेकडे अर्ज केला आहे
मोहित कंबोज म्हणतात की, महापालिकेने काढलेल्या त्रुटींनंतर त्या दुरूस्तीसाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे. ११ एप्रिल रोजी आता माझे राहते घर नियमित करण्यासाठी पालिकेकडे सविस्तर अर्ज केला आहे. यासंबंधी दंडाची किंवा नियमित करण्यासाठी जी काही रक्कम असेल ती मी भरण्यास तयार आहे. महापालिकेने यानंतरही कारवाई केली तर ती चुकीची ठरेल, असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सांताक्रुझ येथील एसव्ही रोडवरील खुशी प्राईड ब्लमोडो या १४ मजली इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्याबाबत एच/पश्चिम विभागाने महापालिका अधिनियम १९८८ अंतर्गत कलम १४४ अन्वये तपासणी करण्याबाबत नोटीस बजावली होती. आपण नियमबाह्य बांधकाम केलेले नाही. मात्र, जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. परंतु आपण घाबरणार नाही. शिवसेना व महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढत राहू, असे भाजप नेते मोहित कंबोज यांनी म्हटले होते.