मुंबई : मालाड पश्चिमेस असलेल्या मालवणी क्षेत्रात मोठी स्लम वसाहत आहे. येथे काल रात्री तीन मजल्याची रहिवाशी इमारत कोसळून पडल्यामुळे ११ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर मुंबईचेभाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
मुंबई शहराचे पालकमंत्री व स्थानिक आमदार अस्लम शेख व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांचा दुर्लक्षपणा व बेजबाबदारपणा या दुर्घटनेला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. जुलै २०२० मध्ये येथे बांधकाम कोसळल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून मालवणी स्लम वसाहतीसाठी योजना करण्यात यावी अशी मागणी मुंबई उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 ऑगस्ट 2020 च्या पत्राद्वारे केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले आणि यात ११ निर्दोष नागरिकांना जीव गमावावा लागला असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2022 मध्ये सर्व प्रकल्प ग्रस्तांना आपले हक्काचे घर देण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी उपाय योजना करू या असे आवाहन त्यांनी केले. मालवणीच्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने आता तरी जागे व्हावे असे देखिल खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे. येथे राहणाऱ्या अनेक नागरिकांनी व झोपडपट्टी 2 ते 3 मजली पक्की घरे बांधली आहेत. राज्य सरकारने मालवणीच्या अनधिकृत बांधकाम व स्लममध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरांच्या बाबतीत जातीने लक्ष घालून आणि त्यातून मालवणीसाठी एक वेगळा आराखडा तयार करुन या दिशेने गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे गोपाळ शेट्टी म्हणाले.
या घटनेतील जखमींना कांदिवली पश्चिम शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची विचारपूस करून आधार देण्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, विधानपरषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चारकोपचे आमदार योगेश सागर, मुंबई भाजप सचिव विनोद शेलार व इतर मान्यवरांनी येथे भेट देऊन आपदग्रस्ताना दिलासा दिला.