खासदार गोपाळ शेट्टी यांना "पिलर ऑफ हिंदुत्व पुरस्कार २०२४" प्रदान
By मनोहर कुंभेजकर | Published: February 16, 2024 05:50 PM2024-02-16T17:50:53+5:302024-02-16T17:51:25+5:30
खा.गोपाळ शेट्टी यांचा सार्वजनिक कामांसोबतच सर्व धर्म समानतेचा लौकिक आहे.
मनोहर कुंभेजकर, मुंबई- देहरादून येथील वेदशास्त्र रिसर्च फाउंडेशन आणि डॉ. वैदेही तमन यांनी धर्म रक्षण, सेवा आणि समर्पण यासाठी आयोजित केलेल्या विशाल हिंदू परिषदेत उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना "पिलर ऑफ हिंदुत्व पुरस्कार-२०२४" ने सांस्कृतिक भवन, देहरादून,उत्तराखंड येथे सन्मानित केले.
या सत्कार समारंभात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत, स्वामी हरी कृपालू महाराज, स्वामी उमाकांतानंद महाराज आणि, माजी केंद्रीय मंत्री सतपाल महाराज यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी मुंबई भाजप नेते डॉ.योगेश दुबे उपस्थित होते.
खा.गोपाळ शेट्टी यांचा सार्वजनिक कामांसोबतच सर्व धर्म समानतेचा लौकिक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सुमारे ३२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना शासकीय व निमसरकारी संस्थांकडून अनेक पदव्या, पुरस्कार, मानसन्मान मिळाला आहेत.
त्यांनी बोरिवलीच्या मध्यभागी प्रखर हिंदू स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांचा भव्य पुतळा आणि अनेक उद्याने उभारून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.त्यानंतर केवळ उद्यानाची उभारणी करून न थांबता त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये बोरिवली ते दादर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक अशी २७ किलोमीटरची दोनदा पदयात्रा केली. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दहिसर पूर्व येथे उद्यान व भव्य पुतळा उभारला.
उत्तर मुंबईत बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी , झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, राजमाता जिजाऊ पुतळा आणि चौक, महाराणा प्रताप यांचा पुतळा व उद्याने, त्यांच्या खासदारकीच्या काळात केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून, भारतीय क्रांतिकारक सेनानी आणि देशभक्त श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थिकलशाच्या प्रवासासाठी बोरिवली येथे भव्य स्वागत कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते.
लोकसभेच्या पटलावर त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली आणि वैयक्तिक प्रयत्नांतून त्यांनी त्यांच्या उत्तर मुंबई परिसरात श्रीमद्भगवद्गीता अभ्यासक्रम सुरू केला.