मुंबई - भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मालवणी येथील सभेत ख्रिश्चनांसंदर्भात केलेल्या विधानामुळे खासदार गोपाळ शेट्टी यांची पक्षाच्या मुंबईतील नेत्यांनी कानउघाडणी केल्यानं गोपाळ शेट्टी नाराज झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे नाराज गोपाळ शेट्टी यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. मालवणीतील एका सभेदरम्यान शेट्टी यांनी ख्रिश्चनांनी स्वातंत्र्यलढ्यात कोणतंही योगदान दिले नसल्याचे वक्तव्य केले होते. या विधानावरुन त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली होती. दरम्यान, आपल्या विधानावर ठाम असून पक्षातील पदापेक्षा भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, असे सांगत राजीनामा देण्यास तयार असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले आहे. गोपाळ शेट्टी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानंच असे विधान केल्यानं 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे सांगत सारवासारव करण्याच प्रयत्न केला आहे.