मुंबई: मेहुण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या Uddhav Thackeray अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांची भागिदारी असलेल्या श्रीजी होम कंपनीत मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केले आहेत. श्रीजी कंपनीशी आपला संबंध नसल्याचं मुख्यमंत्री जाहीर करणार का, असा सवाल सोमय्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
श्रीजी होम कंपनीनं दादरमध्ये एक मोठी इमारत बांधली. त्या कंपनीत २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपयांचं मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. श्रीजी होममध्ये मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर भागीदार आहेत. श्रीजी होममध्ये दोन टप्प्यांत मनी लॉण्ड्रिंग झालं. आधी ५ कोटी ८६ लाख रुपये आणि त्यानंतर २३ कोटी ७५ लाख रुपये कंपनीत गुंतवले गेले, असा आरोप सोमय्यांनी केला. याबद्दलचे पुरावे माझ्याकडे आहेत. मुख्यमंत्री किंवा पोलिसांनी पुराव्यांची मागणी केल्यास सर्व पुरावे देईन असं सोमय्या म्हणाले.
श्रीजी होम कंपनीचं कार्यालय वांद्र्यात आहे. या कंपनीत श्रीधर पाटणकरांची भागिदारी आहे. ते या कंपनीत संचालक आहेत. शिवाजी पार्क परिसरात असलेल्या केटरिंग कॉलेजसमोर श्रीजी होमनं एक इमारत उभी केली आहे. त्यात काळ्या पैशांचा वापर झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. यासंदर्भात मी ईडी, कंपनी मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेतली आहे. त्यासाठी मी दिल्लीलादेखील गेलो होतो, असं सोमय्यांनी सांगितलं.
नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे?ठाकरे कुटुंबाचा मित्र, व्यवसायिक भागीदार असलेला नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला द्यावं. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेंनी चतुर्वेदीसोबत आर्थिक व्यवहार केले आहेत. चतुर्वेदी हवाला ऑपरेटर आहे. तो सध्या कुठे आहे, त्याला फरार घोषित का केलं जात नाही, असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले.