भाजप खासदाराने घेतली मंत्री अस्लम शेख यांची भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:06 AM2021-09-19T04:06:51+5:302021-09-19T04:06:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप खासदाराने एसआरएसंदर्भात मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांची भेट घेतली. एसआरएसंदर्भात असलेल्या अडचणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप खासदाराने एसआरएसंदर्भात
मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांची भेट घेतली. एसआरएसंदर्भात असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी आणि २०१७ सालीचा कायदा लवकर मंजूर करण्यासाठी मी मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या विषयावर सविस्तर चर्चा झाली अशी माहिती दस्तुरखुद्द उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला दिली.
पुढच्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावणार असल्याचे आश्वासन मंत्री अस्लम शेख यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
झोपडपट्टीवासीयांना घरे मिळण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ साली कायदा केला होता. मात्र अजूनही या कायद्याची अंमलबजावणी महाआघाडी सरकारने केली नाही. त्यामुळे सदर कायदा लवकर मंजूर करून गेली अनेक वर्षे पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना घरे द्या या मागणीसाठी खासदार रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी दि. ११ ते दि. १६ पर्यंत उत्तर मुंबईत आंदोलन केले होते.
आपल्या आंदोलनाची दखल विकासक, एसआरए व उपजिल्हाधिकारी यांनी घेतली. या आंदोलनादरम्यान बोरिवली येथील ११ तर मालवणी येथील ९ झोपडपट्टीवासीयांना घरे मिळाली असून पुढील आठवड्यात अजून ५० झोपडपट्टीवासीयांना घरे मिळतील अशी माहिती त्यांनी दिली.
झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांसाठी आपण एकटे लढाई लढत असल्याबद्दल मंत्री शेख यांनी खासदारांचे कौतुक करून महाविकास आघाडी सरकारदेखील तुमच्याबरोबर आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. संबधित अधिकाऱ्यांना फोनाफोनी करून सदर प्रश्नी पुढच्या आठवड्यात बैठक आयोजित करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे खासदार शेट्टी म्हणाले.
मुंबईत झोपडपट्टीवासीयांना पाच लाखांमध्ये घरे मिळाली पाहिजेत आणि यातील अडीच लाख रुपये सरकारने भरले पाहिजे अशी मागणी खासदारांनी केली तर सर्व मुंबईत झोपडपट्टीवासीयांसाठी एकच दर असा चांगला मुद्दा मंत्री अस्लम शेख यांनी मांडला असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंत्री अस्लम शेख हे माझ्या उत्तर मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभेचे आमदार असून मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे सदर प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली. उद्या उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सदर प्रश्नी वेळ दिल्यास त्यांचीसुद्धा भेट घेईन असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला सांगितले.