"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:38 PM2021-03-19T14:38:01+5:302021-03-19T14:48:59+5:30
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याआधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.
नवी दिल्ली/मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असं विधान भाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याआधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही नारायण राणे यांनी यावेळी केली आहे. (bjp leader narayan rane demands that now chief minister uddhav thackeray should resign)
उद्धव ठाकरेंना वर्षभर चांगलं काम करता आलं नाही. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणं वाझेंकडे देण्यात आली होती. संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरणं का देण्यात आली, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेंकडून सर्व कामे करुन घेतली, असा दावा देखील नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर- नारायण राणे @MeNarayanRane
— Lokmat (@MiLOKMAT) March 19, 2021
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' सोहळ्यात घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके, मुंबई पोलिस आयुक्तांची बदली आणि सचिन वाझे प्रकरणावर थेट भाष्य केले. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय तसेच आयुक्तांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून गंभीर चुका घडल्या आहेत. त्या माफ करण्यालायक नाहीत म्हणूनच पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली केल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. तसेच, गृहमंत्री पदावर यापुढेही तुम्हीच असणार का? या प्रश्नावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.
देशमुख यांचे गृहमंत्रिपद पुढील वर्षभर कायम राहणार का? या प्रश्नावर जोपर्यंत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश आहे, तोपर्यंत मी गृहमंत्री राहणार आहे. गृहमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, असे त्यांनी अलीकडेच दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितल्याचेही देशमुख म्हणाले. अनिल देशमुख हे आज सकाळीच दिल्ली दरबारी पोहोचले असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. राज्यातील सचिन वाझे प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत. त्यामुळे, पवार-देशमुख भेटीत नेमकी काय चर्चा होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राजकीय नेत्यांचा धाक असावा पण दबाव नको-
पोलिसांवर राजकीय नेत्यांचा धाक असावा पण दबाव नको. राजकीय नेत्यांचे मार्गदर्शन असावे, पण पोलिसांमार्फत स्वत:चा स्वार्थ साधण्याची वृत्ती नसावी. हेच पोलीस अधिकारी चांगले काम करु शकतात. जेव्हा तुम्ही त्यांना काम करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करता. अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी आपण राजकीय नेते म्हणून आपल्यात बदल केला तर पोलीस व्यवस्था उत्तम काम करु शकेल, असा टोला भाजाप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
उचलबांगडी झालेले परमबीर सिंगही रजेवर!
मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते.