'...पण त्यांचा दौरा यशस्वी होऊ दे'; राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर नारायण राणेंनी दिली प्रतिक्रिया
By मुकेश चव्हाण | Published: January 30, 2021 07:05 PM2021-01-30T19:05:28+5:302021-01-30T19:07:54+5:30
भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी देखील आज राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला.
मुंबई: मुंबईत वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये शुक्रवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसेप्रमुखराज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी देखील राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली मनसेची एक महत्वाची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली ठाकरे देखील उपस्थित राहिल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली देखील होती.
मनसेच्या या बैठकीनंतर राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी दिली. येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतं. मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. याचदरम्यान राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावर अनेक नेत्यांना विचारले असता, ते देखील विविध प्रतिक्रिया देत आहेत.
भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी देखील आज राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला. यावर राज ठाकरे यांचा दौरा यशस्वी होवो हीच शुभेच्छा. एखाद्या नेत्याला वाटलं जावं दर्शन करावं, तर यावर काय बोलणार. पण शुभेच्छा..त्यांचा दौरा यशस्वी होऊ दे, असं नारायण राणे यांनी सांगितले. तसेच मनसे आणि भाजपाच्या युतीबाबतचे प्रयोजन मला माहित नाही, असं स्पष्टीकरण देखील नारायण राणे यांनी यावेळी दिलं आहे.
शिवसेना सगळं बटण दाबून करते-
दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी शिवसेना सहभागी झाली नव्हती. शिवसेना ही मागून असते. ते अंडरग्राऊंड असतात. मातोश्रीवरून बटण दाबलं की रस्त्यावर आलो. शिवसेना सगळं बटण दाबून करते. मातोश्रीची सुरक्षा कडक केली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्या लावल्यात, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...
राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. प्रभू राम हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटून आता तिथे भव्य राम मंदिर उभारले जात आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला हवे. मी स्वतः अयोध्येला जाणार आहे, असं माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मनसेची नक्की भूमिका काय, हे राज ठाकरेही सांगू शकत नाही- काँग्रेस
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, तो त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. कुणी कुठेही जाऊ शकतं. मनसेची भूमिका काय असते हे राज ठाकरेही सांगू शकत नाहीत. जे झेंडे बदलतात त्यांच्याविषयी काय बोलणार, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.