Join us

...तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळाचं पाणी दिलं असतं; नारायण राणे यांचा मिश्किल टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:20 PM

प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार मी पुराव्यानिशी उघड करणार, असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला आहे. 

मुंबई: भाजपाचे नेते नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा हा 'नौटंकी दौरा' असल्याचं सांगत नारायण राणे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहे. नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली. 

नारायण राणे म्हणाले की, तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकणात आले होते. मात्र त्यांनी अजूनही वादळात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मदतीची घोषणा केली नाही. फक्त मदत देऊ असं बोलून होत नाही. लगेच दोन दिवसांत तुम्ही पॅकेज जाहीर का केलं नाही, असं सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. तसेच देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या तिजोरीत काहीच नाही, असं सांगत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी १५ मिनिटांचा दौरा केला. पर्यटकांसराखे फक्त वाळूवर फिरून आले, असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला आहे. पत्रकारांच्या एका प्रश्नावर उद्धव ठाकरे कोकणातील चिवला या ठिकाणी येऊन गेले, असं म्हटलं. यावर हो, ते चिवला येऊन गेले. माझं तिकडे घर आहे. नारायण राणेंनी घर कसं बांधलं, ते बघायला आले असतील. मला याबाबत माहिती असतं, तर मी घरी थांबलो असतो आणि त्यांना नारळाचं पाणी दिलं असतं, असा मिश्किल टोला देखील नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 

कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच पोलीस वसाहतीच्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार होत असून प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार मी पुराव्यानिशी उघड करणार, असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला आहे. 

दरम्यान, ज्याच्या सागरी किनारी जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषांच्या बाहेर जाऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्यात आली होती. तोच निकष या ठिकाणीही असेल. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेनारायण राणे महाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारतौत्के चक्रीवादळभाजपा