BJP MP Narayan Rane News: मालवण सिंधुदुर्गातील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करीत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून, कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते महायुती आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यातच आता भाजपा खासदार नारायण राणे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
जे विरोधक आता पुतळ्याबाबत बोलत आहेत त्यांनी आठ महिन्यांत पुतळा कसा झाला आहे, हे बघितले का? त्याला एखादा हार घातला का? एक आमदार बांधकाम विभागाचे ऑफिस फोडण्यासाठी गेला. तो ऑफिस फोडण्यासाठी गेला ते ऑफिस बंद झाल्यावर आणि मिरवतो की, मी निष्ठावान आमदार आहे. हा निष्ठावान आमदार सकाळी मातोश्री आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असतो, असा खोचक टोला नारायण राणे यांनी वैभव नाईक यांचे नाव न घेता लगावला.
राहुल गांधींचा धर्मच कळत नाही, शरद पवारांनी किती देवळे बांधली
पुतळ्यांच्या आडून मतांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर बोलताना नारायण राणे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पवार साहेबांनी किती देवळे बांधली सांगा, यांना चांगले काहीचे दिसत नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी ही माणसे आहेत. राहुल गांधींबाबत तर काय बोलावे, त्यांचा धर्म कोणता आहे हेच कळत नाही, तर बाकी देऊळ वगैरे बांधायची गोष्टच वेगळी आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी या मुद्द्यावरून आरोप करणाऱ्या विरोधकांना सुनावले.
दरम्यान, काँग्रेसच्या काळात अशा किती दुर्घटना घडल्या आहेत. संपूर्ण इमारतीही कोसळल्या आहेत. असे देशात प्रथमच घडले आहे का, असा प्रतिप्रश्न करत, मी उद्या तिथे जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्वांना बोलावले आहे. सर्व माहिती घेतल्यानंतर सविस्तर बोलेन. असे एक क्षेत्र सांगा जिथे काँग्रेस बदनाम झाली नाही. ते म्हणतात की बेरोजगारी वाढली, पण तुमच्या काळात किती बेरोजगारी होती, असा जाब नारायण राणे यांनी विचारला.