Join us

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी नारायण राणेंना केला फोन; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 12:14 PM

मंत्रिपद जाहीर झाल्यापासूनच राणेंना अनेकांकडून शुभेच्छा येत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता.

मुंबई:  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे ( Narayan Rane ) यांचाही मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आले आहे. नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिपद जाहीर झाल्यापासूनच नारायण राणेंना अनेकांकडून शुभेच्छा येत आहेत. मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी देखील नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मात्र नारायण राणे आणि त्यांच्या मुलाचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 

राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. याचरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर मी नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. मात्र त्यावेळी दोघांचाही फोन बंद होता. त्यामुळे संपर्क झाला नाही. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा संपर्क करुन नारायण राणे यांना शुभेच्छा देईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

तत्पूर्वी, नारायण राणेंना मंत्रिपद जाहीर केल्यापासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच, ‘शरद पवार यांनी मला फोन केला, चांगलं काम करा, असे ते म्हणाले. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचं मन एवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही. मात्र, महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या, त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो, असेही नारायण राणेंनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले?

नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच नारायण राणेंसमोर महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचं तसंच करोना काळात कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याचं आव्हान असल्याचंही ते म्हणाले आहेत.

टॅग्स :राज ठाकरेनारायण राणे मनसेभाजपा