Join us  

'मनात त्याचं दु:ख आजही कायम, मला क्षमा करा'; बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंचं भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 1:22 PM

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी एक भावनिक पत्र लिहित बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना भवन चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

बाळासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त राजकारणातील विविध नेते त्यांना अभिवादन करत आहेत. याचदरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी एक भावनिक पत्र लिहित बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी वृत्तवाहिनीवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. साहेब, आपल्या शेवटच्या दिवसांत मला आपल्याला भेटता आलं नाही याची मला आयुष्यभर खंत राहणार असल्याचं नारायण राणेंनी सांगितले. 

आपल्या शेवटच्या दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटलं ते याही वेळेस मृत्यूला चकवून बरे होतील. पण ते आपल्यातून निघून गेले. मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांच्या मुळं मला तो निर्णय घेणं भाग पडलं. असो. आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही. तुम्ही माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम मला दिलं, असं नारायण राणे म्हणाले.

सेना सोडून बाहेर पडल्यावरदेखील तुम्ही मला दोनदा फोन केलेत. तुमच्या हृदयाच्या मोठेपणाचा आणखी कोणता पुरावा द्यावा? त्यांची प्रकृती बरी नसताना मला त्यांना भेटायचं होतं. ते करता येत नसल्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यांना शेवटचं पहाण्याची संधी मला मिळू शकली नाही आणि ते आपल्यातून निघून गेले. साहेब, मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा, असं म्हणत नारायण राणेंनी आपल्या भावना मोकळ्या केल्या.

 

दरम्यान, बाळासाहेब आपल्या पक्षाचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते. मला स्वतःला साहेबांचं खूप प्रेम मिळालं. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. मी आज जो आहे तो त्यांच्यामुळे आहे हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. 'माणसानं विचारानं श्रीमंत असावं आणि ही श्रीमंती त्यानं वाटत राहिली पाहिजे' हा त्यांचा विचार माझी नेहमी पाठराखण करत राहील. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेता असा माझा जो अविश्वसनीय प्रवास झाला आहे तो केवळ साहेबांच्यामुळेच शक्य झाला आहे. त्यांनी आपला भक्कम पाठिंबा दिल्याचंही नारायण राणेंनी या पत्राद्वारे सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट-

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. बाळासाहेबांनी आपले जीवन लोकांच्या कल्याणासाठी वाहून घेतले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि वक्तृत्तावाची देणगी लाभली होती, असं नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेनारायण राणे भाजपा