Maharashtra Politics: मुंबई, ठाणेसह अन्य महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यासह अन्य ठिकाणी शिवसेनेला निवडणुका कठीण जाणार असून, शिंदे गट आणि भाजपचे मोठे आव्हान असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातच भाजपच्या जागर मेळाव्याला सुरुवात झाली असून, यातील एका मेळाव्याला भाजप खासदार पूनम महाजन यांनी संबोधित केले. यावेळी पूनम महाजन यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
तुम्ही काही म्हणा युतीत भांडणे झाली, महाभारत घडले. पण ते महाभारत घडवणारे शकुनी कोण कोण होते, हे सर्वांना माहिती आहे. हे महाभारत घडवून शकुनींनी आपले वेगळे महाभारत रचले आणि स्वतः सत्तेवर जाऊन बसले. विचारांच्या विरोधात, जनमताच्या विरोधात गेले, या शब्दांत पूनम महाजन यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
सज्जन लोकं माझ्या घरासमोर, ऑफिसबाहेर पोस्टर्स लावतील
मला माहिती आहे जेव्हा मी शकुनी म्हणेन, तेव्हा विरोधातील असलेल्या वेगवेगळ्या पक्षातील सज्जन माझ्याकडे बोट करतील आणि म्हणतील तू कोण आहेस कोणाला बोलणारी? तेच सज्जन लोकं माझ्या घरासमोर पोस्टर्स लावतील, ऑफिसबाहेर पोस्टर्स लावतील. तसेच तुझ्या बापाला कुणी मारले याचे उत्तर आधी दे, असेही आव्हान देतील. परंतु, माझ्या वडिलांना कुणी मारले, हे मला माहिती आहे. प्रत्येक वेळेस असे प्रश्न निर्माण करून फरक पडत नाही. पण, त्यामागे मास्टरमाइंड कोणे होते, हे तुमचे सरकार असताना तुम्ही शोधून दाखवले नाही, अशी खंत पूनम महाजन यांनी बोलून दाखवली.
मुंबई महापालिकेचे महापौरपद भाजपला का दिले नाही?
तुम्ही सज्जन असाल. आपापली राजकीय टिचकी वाजवाल. परंतु, सन २०१४ आणि सन २०१९ मध्ये भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीमुळे मी खासदार झाले आणि याचा मला अभिमान आहे, हे त्या सज्जनांना सांगू इच्छिते. इतकेच नाही तर याच अभिमानाने मी जनतेत जाते आणि कामे करते. आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे, तर आमच्या सज्जनांना आणि मित्रपक्षांना का नाही, असा सवाल पूनम महाजन यांनी विचारला. तसेच भाजप-शिवसेना युतीचा मुद्दा आला की, नेहमी ५०-५० फॉर्म्युला विषयी बोलले जाते. आणि हे बोललेही पाहिजे. एका खोलीत काय झाले हे कळले नाही. पण आमच्या पक्षाच्या सर्वच सर्वोच्च नेत्यांनी अनेकदा सांगितले की, असा फॉर्म्युला कधी ठरला नव्हता. पण जर तुम्ही नेहमी या फॉर्म्युलाचा विषय उकरून काढता, तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की, जर मोठा भाऊ म्हणून ५०-५० फॉर्म्युलाची तुमची अपेक्षा होती, तर २२ नोव्हेंबर २०१९ ला मन मोठे करून मुंबई महापालिकेच्या अडीच वर्षांची सत्ता राहिली होती, तेव्हा ५०-५० फॉर्म्युलानुसार भाजपचा महापौर आता आम्ही करणार आणि मग पुढील रणनीति ठरवू, असे पूनम महाजन यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"