'हिंदुत्वाची परिभाषा एकच'; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रज्ञासिंह ठाकूर यांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 08:58 PM2022-10-06T20:58:05+5:302022-10-06T20:58:21+5:30
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपाच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई- उद्या-परवा या सरकारची शंभरी भरतेय. ९० दिवस दिल्लीतच गेले असतील. माझी तयारी आहे, तुमचे हिंदुत्व काय ते सांगा, मी माझे, बाळासाहेबांचे हिंदुत्व सांगतो, या एकाच व्यासपीठावर असं विधान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात केलं होतं.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मुसलमानांशी चर्चा करायला मशिदीत गेले, तर ते देशप्रेम अन् आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच मोहन भागवत यांच्या भाषणाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह तुम्ही धरला. मला आदर आहे पण उत्तराखंडमध्ये भाजपा नेत्याच्या रिसॉर्टवर अंकिता भंडारी या तरुणीचा खून झाला, मारेकऱ्यांना काय शिक्षा देणार आहात?, गुजरातमध्ये बिल्किस बानोवर बलात्कार करुन तिची हत्या केली. तिच्या मुलीला ठार मारले. त्या लोकांना गुजरात सरकारने जेलमधून सोडले. त्या गुन्हेगारांचा सत्कार केला, अशा हिंदुत्वाचे तुम्ही काय करणार आहात? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला होता.
आम्ही भारतीय जनता पक्षाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलेलं नाही.. आज सुद्धा आम्ही हिंदूच आहोत.. उद्याही हिंदूच असणार.. मरू तेव्हा सुद्धा हिंदूच असणार...
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 6, 2022
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे pic.twitter.com/9Ti6RjIgE1
उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता भाजपाच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदुत्वाची परिभाषा एकच आहे. तुझं हिंदुत्व आणि माझं हिंदुत्व, असा त्यात फरक करताच येणार नाही. कारण हिंदुत्व हे एकच आहे आणि ते सनातन आहे, असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या. मालेगाव बॉम्बस्फोट २००८ च्या खटल्यातील सुनावणीस आज प्रज्ञासिंह ठाकूर यांनी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पाकिस्तानमधील माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांवर निशाणा साधला. तसेच काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तीच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"चंपासिंह थापाला बोलावून CM शिंदेंनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा अपमान केला"
आम्ही भाजपची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला ना. महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस द्यायचा. तुम्ही महागाईवर बोललात, तर जय श्रीराम म्हणतील. ह्रदयात राम आणि हाताला काम पाहिजे. पण हे महागाईवर बोलत नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"