वरुण गांधींचे ठाकरे कुटुंबियांसोबत चांगले संबंध; संजय राऊतांनी भेटीमागचं सांगितलं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 10:51 AM2022-03-30T10:51:39+5:302022-03-30T11:24:43+5:30
भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली.
मुंबई- भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री ही भेट झाली. सुमारे तीन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
वरुण गांधी काल भेटीसाठी आले होते. ते एक राजकीय नेते असले तरी ते लेखक आहेत. छान पुस्तकं लिहितात. अनेक विषयांवर वरुण गांधी चांगल्या गप्पा मारतात. माझी आणि वरुण गांधी यांची भेट सदिच्छा भेट होती. वरुण गांधी आणि त्यांच्या परिवाराचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. ते इतर अनेक नेत्यांनाही भेटतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत आणि वरुण गांधी यांच्यामध्ये देशपातळीवरील अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाली. वरूण गांधी सध्या भाजपापासून अलिप्त राहत असून विविध मुद्द्यावर ते स्वपक्षाला घेरताना दिसत आहेत. त्यामुळे वरुण गांधी भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. अलीकडेच त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजपा हा शब्दही हटवला आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील ते भाजपाचे खासदार आहेत.
दरम्यान, वरुण गांधी सध्या सोशल मीडियावरील आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गांधी कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य असलेल्या वरुण गांधी यांचं भाजपमध्ये जोरदार स्वागत झालं. भाजप नेतृत्त्वाने त्यांना 2013 मध्ये सर्वात कमी वयाचे सरचिटणीस देखील बनवलं. त्यांची लोकप्रियता पाहता भाजपने त्यांची पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणून नेमणूक केली. पण जसजसं राजकीय परिस्थिती बदलत गेली तसतसे वरुण गांधी यांचं पद, सन्मान आणि महत्त्व कमी होऊ लागल्याचं दिसून आलं.
संजय राऊतांचं मौन चर्चेत-
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणेवर तोंडसुख घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केलेल्या एका ट्विटनं विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. कधी कधी मौन हेच सर्वात चांगल उत्तर असतं, असे ट्विट करत संजय राऊत यांनी करत यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, दररोज मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडणारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मौन बाळगल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.