मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर पक्षाचे नेते आक्रमक झालेले दिसत आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विधानावरून याचा प्रत्यय येऊ शकतो. कर्नाटकमधील निकाल जवळपास स्पष्ट झाल्यानंतर शेलार यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमधील भाषा भलतीच आक्रमक असून यामुळे शिवसेनेसारखे विरोधी पक्ष डिवचले जाण्याची शक्यता आहे. शेलार यांनी म्हटले आहे की, कर्नाटकात जिंकलो मतदारांचे आभार! आता भंडारा जिंकू "ठोकून", पालघर जिंकू “ठासून". आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्या या ट्विटमुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात मुख्य लढत ही भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल. राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे तर भाजपाकडून हेमंतकुमार पटले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याकडून आघाडीच्या उमेदवाराल जिंकवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार मुकाबला होण्याची शक्यता आहे. तर पालघरमध्ये भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेने परस्पर उमेदवारी देऊ केली आहे. तर भाजपाने आयत्यावेळी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना गळाला लावत शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले आहे. ही जागा भाजपाची असल्यामुळे शिवसेनेने निवडणुकीतून माघार घ्यावी, असा इशारा वारंवार भाजपा नेतृत्त्वाकडून देण्यात आला होता. मात्र, शिवसेनेने त्याकडे साफ दुर्लक्ष करत भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत.
कर्नाटकचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्ष संघटनेत लावलेल्या रचनेचा, अपरंपार मेहनतीचा विजय आहे तसेच गरीब माणसांचा नेता असा चेहरा म्हणून येडियुरप्पा यांचाही विजय आहे, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.कर्नाटकात भाजपाचा विजय झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी बोलताना आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, कर्नाटकच्या विजयाचे एका वाक्यात वर्णन करायचे तर "विरोधकांच्या घरात घुसून चारीमुंड्या चीत करून मिळवलेला हा विजय आहे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार्यांची तोंडे बंद करणारा हा विजय आहे. या विजयाचे विश्लेषण माध्यमांनी कसेही केले तरी कर्नाटकमधील गरिब, उपेक्षित माणसाला आशेचा एकमेव चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येडियुरप्पा यांचा दिसतो आहे. त्यामुळे बुथपर्यंत लागलेली रचना आणि कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत यांचा विजय आहे, हेही नाकारता येणार नाही. कर्नाटकच्या सर्वच भागातील जनतेने जसा विश्वास दाखवला तसाच विश्वास बेळगाव आणि सीमा भागातील जनतेनेही दाखवला आहे. या विजयानंतर दक्षिण भारतातील आपले यश भाजपाने सिद्घ केल्याचे शेलार यांनी सांगितले.