Join us

Aditya Thackeray vs Ashish Shelar: "अन्याय झाला म्हणून कोल्हेकुई करू नका, आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान देतो की..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 1:31 PM

भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांची संतप्त प्रतिक्रिया

Aditya Thackeray vs Ashish Shelar: मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. बृहन्मुंबई महापालिकेचा २०२३-२४ साठीचा ५२,६१९.०७ कोटींचा मुख्य अर्थसंकल्प पालिका मुख्यालयात सादर करण्यात आला. अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांना अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थ संकल्पात १४ टक्क्यांची वाढ झाली. महापालिकेच्या एवढ्या आर्थिक वर्षात यंदा प्रथमच आयुक्तांनी १५ ते १८ मिनिटात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील निधीची तरतूद ही भाजपा नगरसेवकांचा फायदा व्हावा अशा पद्धतीने करण्यात आल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने नेते आदित्य ठाकरे यांनीही यावरून टीका केली. त्यावर आता, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुद्देसूद खरपूस समाचार घेतला.

"गेली ५ वर्षे मुंबईकरांनीच निवडून दिलेल्या ८२ भाजपच्या नगरसेवकांना निधी वाटपात कारभाऱ्यांनी सापत्न वागणूक दिली. निधीचे कोट्यवधीचे लोंढे मानखुर्द, गोवंडी, मोहम्मद अली रोड आणि मालवणीकडे वेगाने वाहत गेले. ८२ भाजपा नगरसेवकांच्या वाँर्डमध्ये मुंबईकर राहत नव्हते काय? ५ वर्षात ८२० कोटींचा अन्याय केला. त्या ताळेबंदाचा समतोल करुन मुंबईकरांचा अनुशेष कमी केला जातोय. आता महापालिकेतील 'माजी कारभाऱ्यांना' पोटशूळ येऊ नये. 'अन्याय झाला..' म्हणून त्यांनी कोल्हेकुई करु नये! आदित्य ठाकरे यांनी चर्चेला यावे, आमचे खुले आव्हान!" असे ट्विट करत त्यांनी आदित्य ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आणि त्यांना चर्चेचे आव्हान दिले.

राष्ट्रवादीनेही केला भाजपावर आरोप

"भाजपचे वर्चस्व असलेल्या या विशिष्ट प्रभागांना जास्तीत जास्त निधी वाटप केल्यास पक्षाला मतदारांवर छाप पाडण्यास आणि आगामी महापालिका निवडणुकीत त्यांची मते मिळवण्यास मदत होईल. राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेला भाजप, महापालिका आपल्या अंगठ्याखाली आहे याची खात्री करून घेत आहे आणि दुसरीकडे चाणाक्षपणे आपल्या नेत्यांचा वापर करून जनतेला हे दाखवत आहे की महापालिकेच्या कारभारावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्याविरोधात बोलत आहोत.  पण सत्य हेच आहे की पडद्यामागील पक्षपातीपणापासून लक्ष वळवण्याचा हा भाजपचा डाव आहे," असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :आशीष शेलारआदित्य ठाकरेभाजपाशिवसेना