Join us  

भारतीय नौदलाला मिळालेला नवा ध्वज ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट- आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 9:32 PM

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचे PM मोदींनी म्हटले.

Navy new flag: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोचीच्या शिपयार्डमध्ये स्वदेशी आयएनएस विक्रांत हे युद्धवाहू जहाज आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले. INS Vikrant हे भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे जहाज ठरणार आहे. आयएनएस विक्रांत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यासोबतच, मोदींच्या हस्ते यावेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचेही अनावरण करण्यात आले. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचे मोदींनी म्हटले. याबाबत बोलताना या दोन्ही गोष्टी भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत भाजपाचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

"संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि भारतीय नौदलाला आज नवीन ध्वज मिळाला या दोन्ही गोष्टी भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. कारण देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. आयएनएस विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. या नवीन सूर्योदयाचा आज प्रत्येक भारतीय साक्षीदार झाला आहे", असे आशिष शेलार म्हणाले.

"आझादीच्या आंदोलनात क्रांतिकारकांनी एका सशक्त भारताचे स्वप्न पाहिले होते, तेच आज आपण अनुभवत आहोत. आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून या गोष्टी अभिमानास्पद आहे", अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

नौदलाच्या नव्या निशाणावरुन आता सेंट जॉर्ज क्रॉस हटवण्यात आलं आहे. नव्या निशाणात डाव्या बाजूस तिरंगा आणि उजव्या बाजूस निळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर सोनेरी रंगात अशोक चिन्ह साकारण्यात आलेलं आहे. त्याखाली संस्कृत भाषेत 'शं नो वरुण:' असं लिहीण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक दिवशी इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामगिरीचे ओझे उतरवले आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात डौलानं फडकणार आहे.

टॅग्स :आशीष शेलारभारतीय नौदलनरेंद्र मोदी